अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९५.५८ टक्के; वाशिम विभागातून अव्वल, अकोला दुसऱ्या स्थानी
By गणेश वासनिक | Published: May 27, 2024 02:36 PM2024-05-27T14:36:35+5:302024-05-27T14:36:43+5:30
नऊ विभागीय मंडळांमध्ये गेल्या वर्षी ९३.२२ टक्के निकालासह अमरावती विभाग राज्यात सहाव्या स्थानी होता. यावेळी क्रमवारीत पाचव्या स्थानी सुधारणा झाली आहे.
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९५.५८ टक्के लागला आहे. नऊ विभागीय मंडळांमध्ये गेल्या वर्षी ९३.२२ टक्के निकालासह अमरावती विभाग राज्यात सहाव्या स्थानी होता. यावेळी क्रमवारीत पाचव्या स्थानी सुधारणा झाली आहे.
अमरावती विभागातून एकूण १ लाख ६१ हजार ४९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षेला १ लाख ५९ हजार ६८४ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी १ लाख ५२ हजार ६३१ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. अमरावती विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९५.५८ आहे. विभागात निकालाच्या टक्केवारीत वाशीम जिल्हा अव्वलस्थानी आहे.
जिल्हानिहाय निकालाची टक्केवारी
वाशीम: ९६.७१ टक्के
अकोला ९६.४५ टक्के,
बुलढाणा ९५.९५ टक्के,
यवतमाळ ९५.०० टक्के
अमरावती : ९४.६१ टक्के
मुलींचाच वरचष्मा
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात मुलांपेक्षा सरस असल्याचे दाखवून दिले आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९७.१६ टक्के तर मुलांची ९४.१८ टक्के आहे. विभागातून ८४ हजार ८९१ मुलांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ७९ हजार ९५७ मुले, तर ७४ हजार ७९३ मुलींपैकी ७२ हजार ६७४ मुली उत्तीर्ण झाल्या.
प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी सर्वाधिक
अमरावती विभागात उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थ्यांपैकी प्रावीण्यासह प्रथम श्रेणी म्हणजे ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या
विद्यार्थ्यांची संख्या ६० हजार २२५ इतकी आहे. प्रथम श्रेणी म्हणजे ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ५२ हजार ९७६, द्वितीय श्रेणी म्हणजे ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ३२ हजार १०२ तर काठावर ३५ टक्क्यांहून पुढे गुण मिळवणाऱ्याया विद्यार्थ्यांची संख्या ही ७ हजार ३२८ इतकी आहे.