अकोल्यातील मास्टर अँथलेटिक्स स्पर्धेत अमरावतीच्या डॉक्टरचा मृत्यू
By admin | Published: December 5, 2015 09:08 AM2015-12-05T09:08:24+5:302015-12-05T09:08:24+5:30
चालण्याच्यास्पर्धेदरम्यान अमरावती येथील डॉक्टर एस.डी. लाचोरी यांना आली भोवळ.
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर शनिवार, ५ डिसेंबरपासून ३७ वी महाराष्ट्र मास्टर्स आंतरजिल्हा अँथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा-२0१५ सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला शुक्रवार, ४ डिसेंबर रोजी ५ किलोमीटर चालण्याची स्पर्धा घेण्यात आली. लक्ष्य गाठण्यासाठी १0 मीटर अंतर बाकी असताना अमरावतीचे डॉक्टर एस.डी. लाचोरी यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. स्पर्धेत खेळ प्रकार भरपूर असल्याने दोन दिवसांच्या कालावधीत सर्व खेळ स्पर्धा पूर्ण करायच्या होत्या. त्यामुळे एक दिवस आधीच ५ किलोमीटर चालण्याची स्पर्धा घेण्यात आली. सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान ही स्पर्धा सुरू होती. ४५-५0 वर्षे वयोगटात डॉ. लाचोरी अमरावतीचे प्रतिनिधित्व करीत होते. संपूर्ण अंतर अगदी व्यवस्थित चालल्यानंतर फिनिशिंग पॉइंटपर्यंत पोहोचण्यास १0 मीटर अंतर शिल्लक असताना डॉ. लाचोरी यांनी जिंकण्याच्या जिद्दीने वेग वाढविला; मात्र फिनिशिंग पॉइंटवर पाय ठेवण्यापूर्वीच ते खाली कोसळले. यावेळी स्पर्धा निरीक्षक कीर्ती चौधरी तेथे उपस्थित होत्या. स्पर्धा जिंकण्याच्या बेतात असलेले अकोल्याचे डॉ. तरुण राठी तत्काळ डॉ. लाचोरी यांच्याकडे धाव घेतली. डॉ. लाचोरी यांना ताबडतोब खासगी रूग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. तिथे त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. लाचोरी यांचा मृतदेह सायंकाळी ८ वाजता अमरावतीला रवाना करण्यात आला. दरम्यान, स्पर्धेचे उद्घाटन शनिवार सकाळी ११ वाजता पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार होणार आहे. या स्पर्धेत राज्यातील ४५0 प्रौढ खेळाडू सहभागी झाले असल्याचे अकोला जिल्हा मास्टर्स अँथलेटिक्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत तराळ यांनी सांगितले.