Amravati: नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बना, राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 09:51 AM2023-06-25T09:51:54+5:302023-06-25T09:52:26+5:30
Amravati: आता युवकांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे, असा मोलाचा सल्ला राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी दिला.
अमरावती - केंद्र सरकारचे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण है नीतीमूल्य आणि पिढी घडविणारे ठरणार आहे. येत्या काळात आधुनिक शिक्षण प्रणाली विकसित होणार आहे. त्यामुळे आता युवकांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे, असा मोलाचा सल्ला राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी दिला.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी मंचावर मुख्य अतिथी म्हणून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे होते. पुढे राज्यपाल बैस म्हणाले, अमरावती विद्यापीठाने गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर किमान १० गावे दत्तक घेऊन समाजात परिवर्तन करावे. यापुढे कोणतेही महाविद्यालय 'नॅक' मूल्यांकन शिवाय राहता कामा नये, यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेऊन सर्वच महाविद्यालयांचे 'नॅक' करून घ्यावे, असे आवाहन राज्यपाल बैस यांनी केले.
दर्डा सुवर्ण पदकाचे सात गुणवंत ठरले मानकरी
अभियांत्रिकीच्या विविध सहा शाखांतून प्रथम आणि सर्व शाखामधून गुणवत्ता प्राप्त एक अशा सात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. यात आशुतोष राठोड (यवतमाळ), प्रियंका चव्हाण (शेगाव), लखन राठी (अमरावती), प्रतीक जाधव (यवतमाळ), शाहीद शफी तवर (बडनेरा), प्राची अपाले (बडनेरा), समीक्षा ढोक (चरुड) यांना राज्यपाल रमेश बैस, कुलगुरू डॉ. प्रमोद यावले, प्र-कुलगुरु डॉ. प्रसाद वाडेगावकर यांच्या हस्ते पदकांनी गौरविण्यात आले.
सेवाग्रामला भेट
राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी सेवाग्राम आश्रमात भेट दिली. यावेळी त्यांनी आश्रमाविषयी माहिती घेतली. पूज्य बापूजीचा साधेपणा आणि स्वाभाविकता जीवन याविषयी पुस्तकात वाचले होते. आज या ठिकाणी येऊन मी वास्तविकता पाहिली आहे. गांधीजींचे देशाप्रती योगदान विसरू शकत नाही, असा अभिप्राय त्यांनी येथे नोंदविला.