अमरावती : डॉ. विजयकुमार चौबे यांनी फसवणूक करून कुलगुरूपद भूषविले? फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार

By गणेश वासनिक | Published: March 26, 2023 02:50 PM2023-03-26T14:50:41+5:302023-03-26T14:51:40+5:30

युवक कॉंग्रेस आक्रमक, भादंवि संहितेनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

Amravati Dr Vijayakumar Choubey cheated and became vice chancellor complaint in police | अमरावती : डॉ. विजयकुमार चौबे यांनी फसवणूक करून कुलगुरूपद भूषविले? फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार

अमरावती : डॉ. विजयकुमार चौबे यांनी फसवणूक करून कुलगुरूपद भूषविले? फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार

googlenewsNext

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांनी २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत कुुलगुरूपदाचा बेकायदेशीरपणे कारभार सांभाळला. कुलगुरू पदांबाबत राज्यपाल भवनातून कोणतेही आदेश नव्हते, तरीही डॉ. चौबे यांनी शैक्षणिक, प्रशासकीय फाईलींवर स्वाक्षरी केल्या आहेत. हा प्रकार नियमबाह्य असून त्यांच्यावर भादंवि संहितेनुसार गुन्हे दाखल करावे, अशी मागणी युवक कॉंग्रेसने २४ मार्च रोजी फ्रेजरपुरा पोलिसात केली आहे. 

युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय साबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तत्कालीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे हे आजारी असल्याने प्रभारी कुलगुरू पदाचा कारभार डॉ. विजयकुमार चौबे यांच्याकडे देण्यात आला होता. खरे तर प्रभारी कुलगुरू पदासाठी शैक्षणिक पात्रता नसताना डॉ. चौबे यांच्याकडे प्रभारी कुलगुरू पदाचा कारभार कसा सोपविला, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, विद्यापीठ नियमावलीनुसार कुलगुरू पदावर असेपर्यंत प्र-कुलगुरू हे पद कायम असते. त्यानुसार तत्कालीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे २८ जानेवारी २०२३ रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यामुळे कुलगुरूंचे पद रिक्त होताच प्र-कुलगुरूंचे पद नियमानुसार खारीज होते. तथापि, डॉ. विजयकुमार चौबे यांनी राज्यपाल भवनातून प्रभारी कुलगुरूपद स्वीकारण्याचे नव्याने कोणतेही आदेश नसताना स्वयंघोषित कुलगुरू म्हणून २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत प्रभारी कुलगुरू पदांचा नियमबाह्य कारभार हाताळला. ही बाब अतिशय गंभीर असून, शासनाच्या सेवा शर्तीचा भंग करणारी आहे. प्रभारी कुलगुरु पदांचा कारभार हाताळताना फाईलींवर नियमबाह्य स्वाक्षरी केल्याप्रकरणी २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत डॉ. चौबे यांच्या कारभाराची चौकशी करून भादंविच्या संहितेनुसार कार्यवाही करावी, अशा आशयाची तक्रार नोंदविण्यात आली आहे. तसेच राज्यपालांकडे तक्रारही पाठविण्यात आली आहे. 

सिनेटमध्ये गाजला डॉ. चौबे यांचा मुद्दा राज्यपाल भवनातून प्रभारी कुलगुरू पदांचा कारभार हाताळण्यासाठी नव्याने आदेश नसताना डॉ. विजयकुमार चौबे यांनीकशाच्या आधारे हे नियमबाह्य पद सांभाळले. मौखिक आदेशावर कुलगुरूपदांचे कामकाज चालते का? असा सवाल नुटाचे डॉ. डॉ. प्रवीण रघुवंशी, प्राचार्य फोरमचे डॉ. आर.डी. सिकची यांनी १५ मार्च रोजी सिनेटमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी ‘चुप्पी’ साधली होती. डॉ. चौबे यांच्या प्रभारी कुलगुरूंचा कारभारविषयी ते अधिसभेत कुलगुरु, कुलसचिव हे काहीच उत्तर देवू शकले नाही. त्यामुळे याप्रकरणी ‘डाल मे कुछ काला है’ अशा प्रतिक्रिया सिनेट सदस्यांचा उमटल्या होत्या, हे विशेष. 

माजी प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांच्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. याप्रकरणी सोमवारनंतर चौकशी आरंभली जाईल. विद्यापीठ कायदा, नियमावली तपासली जाईल. कशाच्या आधारे प्रभारी कुलगुरूपदाचा कारभार हाताळला, याबाबत कागदपत्रे तपासली जातील.
गोरखनाथ जाधव,
पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

Web Title: Amravati Dr Vijayakumar Choubey cheated and became vice chancellor complaint in police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.