अमरावतीची फेमस 'सांभारवडी', एकदा खातो तो प्रेमातच पडतो..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 02:37 PM2022-02-05T14:37:16+5:302022-02-05T14:42:21+5:30
अमरावतीत आलात अन् इथली सांभारवडीची चव घेतली नाही, तर तो कपाळकरंटाच. एकदा ती खाल्ली की, तुम्ही कचोरी, समोसा विसराल ही हमखास खात्री.
अमरावती : अंबा-एकवीरेचे दैवी अधिष्ठान लाभलेल्या अमरावतीला सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय असा देदीप्यमान इतिहास लाभला आहे. तसा तो खाद्यसंस्कृतीलादेखील लाभला आहे. अंबानगरीच्या मातीने खवय्यांना जसा झणझणीत रस्सा दिलाय, तसे जिभेचे चोचले पुरविणारे नाष्ट्याचे पदार्थदेखील दिले आहेत. त्यातील एक म्हणजे सांभारवडी. विदर्भातील खास सांभारवडी, त्यातही अमरावतीची थोडी आंबट-तिखट थोडी गोड अशी ही खमंग वडी थेट दुबई व त्यापुढे सातासमुद्रापार पोहोचली आहे.
१९६० च्या सुुमारास येथील जयस्तंभ चौकातील एका हॉटेलने सांभारवडी नावाचा नवा पदार्थ खवय्यांसाठी बनविला. आता विदर्भ आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही सांभारवडी मिळते. ती अमरावतीची देण. बेसनाच्या लांबुळक्या नळीत ठासून भरलेला सांभार अन् शेंगदाणेमिश्रित मसाला ही सांभारवडी. अमरावतीत आलात अन् इथली सांभारवडीची चव घेतली नाही, तर तो कपाळकरंटाच. एकदा ती खाल्ली की, तुम्ही कचोरी, समोसा विसराल ही हमखास खात्री. अमेरिका, लंडन, मलेशिया, चीन, पाक या राष्ट्रांसह अंबानगरीतील खास सांभारवडी देशाच्या कानाकोपऱ्यात ‘पार्सल’ केली जाते. लोक देशविदेशात जाताना १०/२० प्लेट्स सांभारवडी पॅक करून घेऊन जातात. ती आठवडाभर खाण्यायोग्य असते, राहते.
वैदर्भीय मातीत रुजली
अमरावतीचे नाव निघाले अन् खाद्यपदार्थांच्या चटकदार रेसिपीचा साधा उल्लेख जरी झाला तरी अस्सल खवय्यांच्या जिभेला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. अमरावतीकर खवय्या जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात का असेना, येथे आल्यानंतर एकदा तरी सांभारवडीवर ताव मारल्याशिवाय राहत नाही. काही भागात तिला कोथिंबिरची वडी म्हणतात, तर वऱ्हाडात विशेषत: अमरावतीच्यालगतच्या भागात सांभारवडीच म्हटले जाते.
शेतीशी आहे संबंध
विदर्भात थंडीच्या दिवसांत सांभाराची आवक वाढते. अगदी १० रुपयांमध्ये गड्डी विकली जाते. जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणात सांभाराचे उत्पादन होते. म्हणून हा पदार्थ येथील खाद्यसंस्कृतीत रुजला. खाण्याबाबत अमरावतीकर हात आखडता घेत नाहीत. कचोरी, समोसा, शेगाव कचोरी, तर्री मिश्रित मिसळ हे अस्सल मसालेदार पदार्थ त्यामुळेच येथील खाद्यसंस्कृतीत रुजले. मग सांभारवडी तरी त्याला अपवाद कशी असू शकेल? म्हणून गेल्या ५० वर्षात येथील छोट्या हॉटेलमध्येदेखील समोसा, कचोरी न् सांभारवडीच प्राधान्याने ठेवली जाते.