Amravati: अमरावती येथे तीन कोटींच्या ई-निविदेत गौडंबगाल; तीनदा उघडल्याचा आराेप? भिवापूर लघु प्रकल्पात गैरप्रकार
By गणेश वासनिक | Published: May 20, 2024 09:33 PM2024-05-20T21:33:04+5:302024-05-20T21:33:38+5:30
Amravati News: तिवसा तालुक्यातील भिवापूर लघु प्रकल्पाचा सांडवा आणि कालव्याच्या दुरुस्तीसाठी महा ई निविदा संकेतस्थळावर तीन कोटींच्या कामांची निविदा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी परस्पर तीनदा उघडली. मात्र, या निविदेत मर्जीतील कंत्राटदाराने निविदा न भरल्याने ती रद्ददेखील करण्यात आली आहे.
- गणेश वासनिक
अमरावती - तिवसा तालुक्यातील भिवापूर लघु प्रकल्पाचा सांडवा आणि कालव्याच्या दुरुस्तीसाठी महा ई निविदा संकेतस्थळावर तीन कोटींच्या कामांची निविदा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी परस्पर तीनदा उघडली. मात्र, या निविदेत मर्जीतील कंत्राटदाराने निविदा न भरल्याने ती रद्ददेखील करण्यात आली आहे. या नियमबाह्य कारभाराची चौकशी व्हावी, यासाठी पुराव्यानिशी तक्रार करण्यात आली आहे.
अमरावती येथील पाटबंधारे विभागाचे मुख्य अधीक्षक अभियंता राजेश सोनटक्के यांना १३ मे २०२४ रोजी दिलेल्या तक्रारीत अचलपूर येथील मध्यम व लघु पाटबंधारे विभागाचे तत्कालीन प्रभारी अभियंता अनिकेत सावंत यांनी सूचना क्रमांक ०६/ २०२२-२३ नुसार ३ कोटी ३७ लाख रुपयांची निविदा शासनाच्या महा ई टेंडर वेबसाईट पोर्टलवर २१ नोव्हेबर २०२२ रोजी प्रसिद्ध केली, तर ५ डिसेंबर २०२२ ही निविदा उघडणे आणि ७ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, कार्यकारी अभियंता सावंत यांनी पदाचा दुरुपयोग करून वरिष्ठांची परवानगी न घेता पोर्टलवरील निविदा एक नव्हे, तर तीन वेळा उघड केली. तसेच कोणकोणत्या कंत्राटदाराने किती रक्कमेची निविदा भरली ते पाहिले. परंतु, आपल्या मर्जीतील एकही कंत्राटदाराने निविदा न भरल्यामुळे कोणतेही कारण नसताना ही निविदा रद्द केल्याचे पत्र अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविले. हा प्रकार नियमबाह्य असून, पाटबंधारे खात्याची फसवणूक केल्याप्रकरणी या वादग्रस्त निविदा प्रक्रियेची चौकशी करून दोषी आढळल्यास फौजदारीसह निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने शैलेंद्र मालविय यांनी केली आहे.
ई-निविदा परस्पर उघडली असे काहीही झालेले नाही. तेव्हा प्रणालीत बिघाड झाला होता. पण ही निविदा उघडण्यापूर्वी रद्द करण्यात आली. मध्यंतरी सरकारचे अधिवेशन आले. त्यानंतर पुन्हा इस्टिमेट तयार करून मुख्य अधीक्षक अभियंत्यांच्या मंजुरीने कार्यवाही करण्यात आली.
- अनिकेत सावंत, कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व पाटबंधारे विभाग, अमरावती.