अमरावती : विकास आराखड्यावर ग्रामपंचायतींची मदार; ‘आमचं गाव - आमचा विकास’ उपक्रम; लोकसहभागाची हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 04:49 PM2018-02-06T16:49:54+5:302018-02-06T16:50:28+5:30
‘आमचं गाव - आमचा विकास’ उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘ग्रामपंचायत विकास आराखडा - जीपीडीपी’ तयार करावयाचा असून, त्यावर शासननिधीची मदार राहणार आहे
अमरावती : ‘आमचं गाव - आमचा विकास’ उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘ग्रामपंचायत विकास आराखडा - जीपीडीपी’ तयार करावयाचा असून, त्यावर शासननिधीची मदार राहणार आहे. सन २०१८-१९ चा वार्षिक आराखडा अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी प्रस्तावित उपक्रम व वस्तुनिष्ठ अपेक्षित निधी विचारात घेऊन विकास आराखडा अंतिम करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.
ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करताना राबविण्यात आलेल्या लोकसहभागाच्या नियोजन प्रक्रियेमुळे गावांच्या विविध स्वरूपाच्या व वेगवेगळ्या क्षेत्रातील गरजा निश्चित करून गरजांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. तथापि, ग्रामपंचायतींनी विकास आराखड्यासाठी वेगवेगळ्या निधीच्या स्रोतातून उपलब्ध होणाºया निधीचा घेतलेला अंदाज वस्तुनिष्ठ नसल्याचे निरीक्षण सरकारने नोंदविले. त्या पार्श्वभूमीवर सन २०१७-१८ च्या वार्षिक आराखड्यानुसार प्रत्येक स्रोतामधून अपेक्षित निधी व प्रत्यक्षात प्राप्त झालेला निधी विचारात घेऊन सन २०१८-१९ चा वस्तुनिष्ठ अपेक्षित निधी निश्चित करावा; अपेक्षित निधीनुसार मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सन २०१८-१९ चा वार्षिक आराखडा अंतिम करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत हद्दीतील व मालकीच्या आणि जिल्हा परिषदेच्या मालकीच्या, तथापि गावासाठी वापरत असलेल्या सर्व शाळा, अंगणवाड्या इमारतीची दुरूस्ती व देखभालीसाठी पुरेशी तरतूद करावी. यात ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, स्वच्छतागृहांचा समावेश असावा, वार्षिक आराखडा अंतिम करताना ग्रामपंचायतींनी सामूहिक स्वरूपाच्या प्रकल्पांवर प्राधान्याने निधीची तरतूद करणे अपेक्षित आहे.
या बाबींचा समावेश दरवर्षी ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण (कन्व्हर्ज$न्स) करून योजनांतर्गत जास्तीत जास्त निधी प्राप्त करण्याचा प्रथम प्रयत्न करावा. दारिद्र्य निर्मूलन, लिंगभाव समानता, स्वच्छ व सुरक्षित पाणी, स्वच्छता, शांतता, न्याय, सर्वसमावेशक विकास, समानता, उद्योजकता, मूलभूत सुविधा या बाबी ग्रामपंचायतींना विकास आराखड्यात अंतर्भूत राहणार आहेत. ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना प्रवीण प्रशिक्षक व प्रभारी अधिकाºयांची मदत घेतली जाणार आहे.