पत्नी, मुलीला संपवून घेतला गळफास; दोघींचे मृतदेह तीन दिवस ठेवले झाकून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 02:46 PM2021-07-04T14:46:51+5:302021-07-04T14:51:05+5:30
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील भामोद येथे पत्नी व मुलीला संपवून पतीने स्वत: आत्महत्या केल्याची थरारक घटना शुक्रवारी उघडकीस आली.
प्रदीप भाकरे -
अमरावती: नागपूर येथे पत्नी, मुले, मेहुणी व सासूचा खून करून स्वत:ला संपविण्याच्या थरारक घटनेची शाई वाळते न वाळते तोच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील भामोद येथे पत्नी व मुलीला संपवून पतीने स्वत: आत्महत्या केल्याची थरारक घटना शुक्रवारी उघडकीस आली. पत्नी व मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर तब्बल तीन दिवस तो मृतदेहांसोबत जागला. मृतदेहांच्या विल्हेवाटीचा पर्याय न सुचल्याने त्याने अखेर चौथ्या दिवशी स्वत:लाही संपविले. धाकटी मुलगी मामाकडे असल्याने तिचे प्राण वाचले. (Amravati The husband strangled his wife and daughter )
२५०० लोकसंख्येच्या भामोद येथे एका घरातून येणाऱ्या कुजकट दुर्गंधीने अनेकांचे पाय तिकडे वळले अन् या छोट्याशा खेड्याने आक्रित अनुभवले. एका व्यसनाधीन, वैफल्यग्रस्त कुटुंबप्रमुखाने स्वत:सह पत्नी व मोठ्या मुलीला जिवानिशी संपविले. अनिल देशमुख (४७), पत्नी वंदना (४०) व मुलगी साक्षी (१७) अशी मृतांची नावे आहेत. पत्नी व मुलीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत, तर अनिलचा मृतदेह त्याच्याच घरात वहिनी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. शनिवारी येवदा पोलिसांनी मृत अनिलविरुद्ध भादंविचे कलम ३०२ व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलम २०१ अन्वये गुन्हा दाखल केला. तिघांचेही मृतदेह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. शनिवारी दुपारी सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मायलेकीचे मृतदेह पोत्यांनी झाकले
पहिल्या खोलीत दिवानाखाली साक्षीचा मृतदेह आढळला. तो दृष्टीस पडू नये म्हणून पोत्यांनी झाकला होता. पुढील खोलीतील एका कोपऱ्यात वंदना यांचा मृतदेहदेखील पोत्यांनी झाकून ठेवला होता. दोन्ही मृतदेह कुजले होते. घटनास्थळावरील निरीक्षण व शवविच्छेदन अहवालाच्या आधारे अनिलने पत्नी व मुलीचा गळा आवळून खून केला, नंतर स्वत:लाही संपविले, असे पोलिसांनी स्पष्ट केले.