Amravati: लग्न तोडले नाहीस तर तुझ्यासह नवऱ्याचा मुडदा पाडतो! तरुणीला धमकी
By प्रदीप भाकरे | Published: July 9, 2023 02:36 PM2023-07-09T14:36:26+5:302023-07-09T14:36:48+5:30
Amravati: तू तुझे जुळलेले लग्न तोडले नाहीस, तर तुझ्या लग्नात येऊन धिंगाणा घालेन, तुझ्यासह तुझ्या पती व आईवडिलांना मारून टाकून स्वत: देखील आत्महत्या करेन, अशी गर्भित धमकी एका २२ वर्षीय उपवर तरुणीला देण्यात आली.
- प्रदीप भाकरे
अमरावती - तू तुझे जुळलेले लग्न तोडले नाहीस, तर तुझ्या लग्नात येऊन धिंगाणा घालेन, तुझ्यासह तुझ्या पती व आईवडिलांना मारून टाकून स्वत: देखील आत्महत्या करेन, अशी गर्भित धमकी एका २२ वर्षीय उपवर तरुणीला देण्यात आली. एकतर्फी प्रेमातून दिलेल्या त्या धमकीमुळे ती तरूणी नखशिखांत हादरली. धमकीच्या त्या कॉलबाबत कुटुंबियांना सांगत तिने खल्लार पोलीस ठाणे गाठले.
याप्रकरणी खल्लार पोलिसांनी त्या तरूणीच्या तक्रारीवरून ८ जुलै रोजी रात्री १०.२० च्या सुमारास आरोपी चेतन बाळकृष्ण गवळी (२८, रा. वातोंडा) याच्याविरूध्द विनयभंग व धमकीचा गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, फिर्यादी तरूणी ही सन २०१८-१९ मध्ये महाविद्यालयात अकरावी, बारावीचे शिक्षण घेत होती. त्यावेळी आरोपी हा तिच्यासोबत बोलत होता. त्याने तिला प्रपोज सुध्दा केले होते. तेव्हा तिने आरोपीला नकार दिला होता. मला तुझ्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, माझ्या मागे यायचे नाही. मला त्रास दयायचे नाही, असे तिने त्याला बजावले. तरी देखील तो तिला फोन कॉल करत राहायचा.
लग्नात विघ्न नको म्हणून...
दरम्यान, त्या तरूणीचे अलिकडे अन्य एका मुलासोबत लग्न जुळले आहे. ते आरोपी चेतनला माहित झाल्याने तो तिला वारंवार फोन करू लागला. तू तुझे लग्न तोडून माझ्यासोबत लग्न कर, असा हेका त्याने धरला आहे. ७ जुलै रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास त्याने तिला फोन करून धमकी दिली. तू जर लग्न तोडले नाहीस, तर मी तुझ्या लग्नाच्या दिवसी लग्नात येऊन तुला, तुझ्या नवऱ्याला, आईला, वडिलांना मारून टाकतो, अशी धमकी दिली. त्याने त्या गर्भित धमकीसह आत्महत्या करण्याचा इशारा तिला दिला. त्यामुळे ती प्रचंड घाबरली. लग्नात विघ्न नको, म्हणून तिने पोलीस ठाणे गाठले.