अमरावतीकरांनो, विकास हवा असेल तर पाणी वाचवा!
By admin | Published: March 22, 2016 12:21 AM2016-03-22T00:21:33+5:302016-03-22T00:21:33+5:30
राज्यात मागील काही वर्षांपासून पाऊस अनियमित झाला आहे. त्यामुळे वारंवार दुष्काळीस्थिती निर्माण होते.
जागतिक जलदिन : पाण्याचा अपव्यय ठरू शकतो घातक, अप्पर वर्धा धरण ठरले वरदान
अमरावती : राज्यात मागील काही वर्षांपासून पाऊस अनियमित झाला आहे. त्यामुळे वारंवार दुष्काळीस्थिती निर्माण होते. अलिकडे पाणीटंचाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उन्हाळा आला की राज्यात पाणीटंचाईची भीषण तीव्रता जाणवू लागते. सुदैवाने अमरावती जिल्ह्यात मात्र पाणीटंचाईचे सावट नाही. परंतु अमरावतीकरांनी मुबलक उपलब्ध असलेल्या पाण्याचे महत्त्व वेळीच ओळखायला हवे. पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवून भविष्यात अमरावतीचा मराठवाडा होऊ नये, याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. अमरावतीत नळाची तोटी उघडताच शुद्ध पाणी मिळते. परंतु जे सहज मिळते त्याची किंमत न करणे, हा मानवी स्वभावगुण आहे. ‘मिल गया तो मिट्टी है, खो गया तो सोना है’ या उक्तीप्रमाणे मुबलक उपलब्ध असलेल्या पाण्याचा गैरवापर होऊ देऊ नये. शहराला अप्पर वर्धा धरणातून पाणीपुरवठा होतो. शहरापासून ५५ किलोमिटर अंतरावरून सिंभोराधरणातून पाणी, शहरात पोहोचते. या धरणातील पाण्याचा साठा बहुदा त्यावर्षी पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतो. पाणी वितरणाची प्रक्रिया जरा समजून घेऊ या. धरणात साठविलेले पाणी पंपिंग स्टेशनमधून २२ किलोमिटर अंतरावरील नेरपिंगळाई येथील टेकडीवर पाईपलाइनद्वारे चढविले जाते. यासाठी ७५० हॉर्सपॉवरचे पाच पंप पंपिंग स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. नेरपिंगळाई येथे साठविलेले पाणी नंतर उतारामुळे (ग्रॅव्हिटीमार्फत) ३३ किलोमिटरचे अंतर पार करून शहरात आणले जाते. येथील जलशुद्धीकरण केंद्रात सात टप्प्यांमध्ये पाणी शुद्ध केले जाते. पश्चात त्या पाण्याचे वितरण होते. या प्रक्रियेचा महिन्याचा खर्च दोन कोटींच्या घरात आहे. कोणत्याही शहराचा विकास तेथील उद्योगधंद्यांवर अवलंबून असतो व उद्योग हे पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. त्यामुळेच विकासासाठी अमरावतीकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.
गावाची, शहराची, राज्याची व देशाची प्रगती साधायची असल्यास आपल्याला पाण्याचे मोल समजावे लागेल व पाण्याचा वापर काटकसरीनेच करावा लागेल. पाणी बचतीचे छोटे-छोटे उपाय अंमलात आणल्यास आपण भीषण पाणीटंचाईवर मात करू शकतो.
- संदीप ताटेवार
स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख,
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती