पाणी पिताय की रोगजंतू? १७६ गावांतील पाणी जोखमीचे; आरोग्य विभागाचा अहवाल
By जितेंद्र दखने | Published: July 10, 2023 05:54 PM2023-07-10T17:54:38+5:302023-07-10T17:54:45+5:30
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या पाणी सर्वेक्षणात जिल्ह्यातील ६३७ ग्रामपंचायतीमधील ६१५२ जलस्त्रोतांचे नमूने आरोग्य विभागाकडून तपासण्यात आले.
अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या पाणी सर्वेक्षणात जिल्ह्यातील ६३७ ग्रामपंचायतीमधील ६१५२ जलस्त्रोतांचे नमूने आरोग्य विभागाकडून तपासण्यात आले. यापैकी तीव्र जोखीम असलेला एक जलस्त्रोत अचलपूर तालुक्यात आढळून आला आहे. याशिवाय मध्यम जोखीमीचे १७६ आणि आणि सौम्य जोखीमचे ६५६ स्त्रोत आढळून आले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर पाण्याच्या स्रोतांची तपासणी केली जाते. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्याची गुणवत्ता पाहून ग्रामपंचायतींना हिरवे, पिवळे व लाल कार्ड दिले जाते.
ज्या गावातील पाणी स्वच्छ आहे त्या गावांना हिरवे कार्ड दिले जाते. ज्या गावांतील पाणी दूषित झाले आहे. त्यापासून साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता असल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे, अशा गावांना पिवळे कार्ड दिले जाते. ज्या गावातील पाणी पिण्यास अयोग्य आहे, अशा ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले जाते.जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ८३७ ग्रामपंचायतींमधील ६ हजार१५२ पाण्याच्या स्रोतांची तपासणी केली. जिल्हा प्रयोगशाळेतून हे पाण्याचे नमुने तपासून घेतले जातात. यामध्ये ६५६ गावांमधील पाणी स्वच्छ तर १७६ गावांमधील पाणी सौम्य जोखीमीचे आढळून आले आहे. एप्रिल महिन्यात तपासण्यात आलेल्या तपासणी अहवालानुसार सर्वाधिक ५३ गावे धारणी तालुक्यातील आहेत. अचलपूर तालुक्यातील एका गावामध्ये दूषित पाणी आढळून आले आहे.जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दर महिन्यात तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या वाढत आहे.
मध्यम जोखीमचे तालुकानिहाय गा.प.संख्या
अमरावती १४,अंजनगाव सुजी ०४,अचलपूर २८,चांदूर रेल्वे ०३,धामनगांव रेल्वे ०७,चांदूर बाजार ११,तिवसा ०५, दर्यापूर ३३, नांदगाव खंडेश्र्वर ०५,वरूड ०२, माेर्शी ०५,भातकुली ००,चिखलदरा ०५,धारणी ५६
पिवळे कार्ड दिलेल्या ग्रामपंचायतींना खबरदारी
घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी दूषित होण्याची कारणे शोधण्यास तसेच याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मोहीम हाती घेण्यास सांगण्यात आले आहे. डॉ. सुभाष ढोले - जिल्हा आरोग्य अधिकारी.