Amravati: एन्फ्लूएंझाआड कोरोनाची रुग्णवाढ, दोन दिवसांत नऊ पॉझिटिव्ह, लसीकरण महत्त्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 05:27 PM2023-03-11T17:27:46+5:302023-03-11T17:28:35+5:30
Amravati News: एन्फ्लूएंझा-ए या विषाणूचा उपप्रकार असलेला एच-३ एन-२मुळे प्रादुर्भाव वाढत आहे. हवेद्वारे विषाणू पसरत असल्याने अनेकांना संसर्ग झालेला आहे. या आजाराचे लक्षणेही कोरोनासारखेच आहे.
- गजानन मोहोड
अमरावती : एन्फ्लूएंझा-ए या विषाणूचा उपप्रकार असलेला एच-३ एन-२मुळे प्रादुर्भाव वाढत आहे. हवेद्वारे विषाणू पसरत असल्याने अनेकांना संसर्ग झालेला आहे. या आजाराचे लक्षणेही कोरोनासारखेच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन दिवसांत नऊ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली, त्यामुळे वेळेत तपासणी करून घ्यावी अन् बूस्टर डोस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सहा महिन्यांत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आलेला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे लसीकरण आहे. याद्वारे सामूहिक प्रतिकारशक्ती वाढल्याने कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर ४८ तासांत नऊ पॉझिटिव्हची नोंद चिंता वाढविणारी आहे. हे सर्व रुग्ण बडनेरारोड मार्गावर दसरा मैदानलगतच्या भागातील आहे. या रुग्णांचे नमुने आयसोलेशन सेंटरमधून तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १४ सक्रिय रुग्ण आहेत.