अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरण : अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर ठपका?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2022 03:33 PM2022-07-05T15:33:46+5:302022-07-05T16:55:07+5:30
८ कर्मचारी, ४ अधिकारी, १० कैद्यांचे बयाण नोंदविले
अमरावती :अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या ‘जेलब्रेक’प्रकरणी पाच दिवसांनंतर चौकशी पूर्ण झाली आहे. चाैकशी समितीने कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर ठपका ठेवला आहे. दरम्यान ८ सुरक्षा कर्मचारी, ४ अधिकारी आणि १० कैद्यांचे बयाण नोंदविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या आठवड्यात ही समिती कारागृह प्रशासनाच्या डीआयजी स्वाती साठे यांच्याकडे चौकशी अहवाल सादर करणार आहे.
चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांच्या नेतृत्वातील चमूने याप्रकरणी चौकशी पूर्ण केली. बराकीचे कुलूप तोडून पलायन करणारे घटनास्थळ, पसार तीनही कैद्यांची हिस्ट्री, बराकीतून बाहेर पडण्याचा मार्ग, छतावर चढण्यासाठी वापरलेले अंथरूण, बराक क्रमांक १२ मधील रात्र पहारेकरी, सुरक्षा रक्षक, सुरक्षा अधिकारी आदी बाबी चौकशी समितीने नमूद केल्या आहेत. २८ जून रोजीच्या पहाटे १.३० ते २ वाजेदरम्यान ‘जेलब्रेक’ करून तीन कैदी पसार होण्याकरिता अंतर्गत सुरक्षा व्यवस्था कारणीभूत असल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. त्यामुळे येत्या काळात या कारागृहातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई निश्चित केली जाणार आहे.
‘जेलब्रेक’प्रकरणाचा मास्टर माईंड साहिल कालसेकर
अमरावती कारागृहातून साहिल अजमत कालसेकर (३३, नायसी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी), सुमित शिवराम धुर्वे (१९) व रोशन गंगाराम उईके (२३, रा. बालापेठ, शेंदुरजनाघाट, ता. वरूड, जि. अमरावती) हे तीन कैदी पसार झाले आहेत. ही मोहीम फत्ते करणारा मास्टर माईंड साहिल कालसेकर असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे रत्नागिरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, घटनेला सहा दिवस लोटूनही पोलिसांंना काहीही सुगावा लागलेला नाही.
जमीं खा गयी या आसमां निगल गया...
पसार कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयाची गुन्हे शाखा, फ्रेजरपुरा पोलीस, शेंदुरजनाघाट, रत्नागिरी पोलीस तपास करीत आहेत. घटनेच्या सहा दिवसांनंतरही पसार कैदी शोधून काढण्यात पोलिसांना यश आले नाही. कारागृहाने स्थापन केलेल्या समितीकडून चौकशी पूर्ण झाली तरी पसार कैदी हाती लागले नाही. त्यामुळे या कैद्यांना जमीं खा गयी या आसमां निगल गया... असे म्हणण्याची वेळ गृह विभागावर आली आहे.