IND vs SL T20I : अमरावतीचा जितेश शर्मा भारतीय संघात; पंजाब किंग्सच्या स्फोटक फलंदाजाची एन्ट्री
By गणेश वासनिक | Published: January 5, 2023 03:11 PM2023-01-05T15:11:13+5:302023-01-05T15:12:09+5:30
India vs Sri Lanka : संजू सॅमसन याला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर व्हावं लागलं आहे. सॅमसनच्या जागी आता आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जकडून लक्षवेधी कामगिरी केलेल्या जितेश शर्मा याला संधी देण्यात आली आहे.
अमरावती - विदर्भाचे रणजी करंडक क्रिकेटमध्ये प्रतिनिधीत्व करणारा अमरावतीचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा ( Jitesh Sharma) याची भारतीय संघात निवड झाली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतून संजू सॅमसन याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. सॅमसनच्या जागी आता आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जकडून लक्षवेधी कामगिरी केलेल्या जितेश शर्माला संधी देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय खेळाडू गोलंदाज उमेश यादव हा आयपीएलमध्ये खेळत असून त्याच्यासह यंदा वैदर्भीय म्हणून विदर्भाचा यष्टीरक्षक फलंदाज मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. सलामीला चांगली सुरुवात देणारा अशी जितेशची ख्याती आहे. याआधी मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज अपूर्व वानखडेची मुंबई इंडियन्सने निवड केली होती. परंतु, त्याला प्रत्यक्ष आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
पंजाब किंग्सने जितेशला करारबद्ध करण्याची ही सलग दुसरी वेळ होय, गतवर्षीही त्याला PBKSने करारबद्ध केले होते. परंतु, राखीव खेळाडू तसेच भविष्यात उपयोगी ठरेल म्हणून त्याला संघात घेण्यात आले होते. यष्टीरक्षणासोबतच सलामीला विदर्भाकडून जितेशने यंदाच्या मोसमात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे यंदा त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता असल्याचे मत त्याचे अमरावती येथील प्रशिक्षक प्रा. दीनानाथ नवाथे व सहायक प्रशिक्षक आल्हाद लोखंडे यांनी व्यक्त केले.
विशेष बाब अशी की, राजस्थानविरुद्ध टी २० सामन्याच्या अंतिम षटकात विदर्भाला १४ धावांची आवश्यकता असताना अपूर्वने विजय मिळवून दिला. या कामगिरीमुळेच त्याची सुरेश रैनाच्या नेतृत्त्वातील मध्य विभाग संघात वर्णी लागली आहे. जितेशनेही टी२० स्पर्धेत सलामीवीर म्हणून अर्धशतकी खेळी केली आहे. यंदा त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली तर नवीन यष्टीरक्षक फलंदाज म्हणून तो नावारुपाला येऊ शकतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"