पॅसिव्ह स्मोकिंगच्या विळख्यात अमरावती

By admin | Published: January 20, 2016 12:23 AM2016-01-20T00:23:02+5:302016-01-20T00:23:02+5:30

शासन कोट्यवधी रुपये खर्च करुन देशभर व्यसनमुक्ती अभियान राबविते.

Amravati is known for its passive smoking | पॅसिव्ह स्मोकिंगच्या विळख्यात अमरावती

पॅसिव्ह स्मोकिंगच्या विळख्यात अमरावती

Next

नियमांचे उल्लंघन : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान; कारवाई का नाही?
संदीप मानकर अमरावती
शासन कोट्यवधी रुपये खर्च करुन देशभर व्यसनमुक्ती अभियान राबविते. परंतु बेजबाबदार नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक ठिंकाणी राजरोस धुम्रपान करतात. सिगारेटचा एक ‘कश’ मृत्यूला आमंत्रण देण्यास पुरेसा आहे, हे माहित असूनही तरुणाई फॅशनच्या आहारी जाऊन सध्या धुम्रपानाच्या विळख्यात अडकली आहे नव्हे संपूर्ण शहरच सध्या ‘पॅसिव्ह स्मोकिंग’च्या विळख्यात अडकली आहे.
शहरातील विविध महाविद्यालयांच्या कॅम्पसमधील कॅन्टिनमध्ये अल्पवयीन विद्यार्थी बिनधास्त सिगारेट ओढताना निदर्शनास येतात. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या धुम्रपानामुळे त्या कक्षेत येणारे अनेक निर्दोष लोकही विनाकारण आजारांना बळी पडतात. प्रत्यक्ष धुम्रपान म्हणजे ‘अ‍ॅक्टिव्ह’ स्मोकिंग न करताही इतरांच्या धुम्रपानामुळे म्हणजे ‘पॅसिव्ह’ स्मोकिंगमुळे त्या धुराच्या संपर्कात येणाऱ्या इतरांनाही कॅन्सर, फुफ्फुसाचे आजार, दमा, खोकला व अन्य जीवघेणे आजार होऊ शकतात.
अंबानगरीत शेकडो पानटपऱ्या आहेत. तेथे सर्रास धुम्रपान करणारे तरूण आढळतात. वास्तविक हॉटेल, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, उद्याने, शाळा, महाविद्यालये आदी परिसरात सिगारेट, गुटखा व अन्य कोणतेही धुम्रपान करण्यास कायद्याने बंदी आहे.

अन्न, प्रशासन विभागाच्या वर्षभरात डझनभर कारवाया?
अमरावती : सिगारेटच्या पाकिटावरही ‘सिगारेट स्मोकिंग इज इन्ज्युरिअस टू हेल्थ’ असे स्पष्ट लिहिलेले असते. ६० ते ७० टक्के तरुण व ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील थराराचा अनुभव घेणारे हौशी धुम्रपानाच्या क्षणिक मोहाला बळी पडतात. शहरातील चहाच्या अनेक कॅफेमध्ये तरुणांसाठी सिगारेट ओढण्यासाठी अधिकृत केबिन उपलब्ध करुन देण्यात येते. नोकरदारवर्ग देखील कार्यालयाबाहेरील चहाच्या कँटीनमध्ये ‘हर फिक्र को धुएं में उडाता चला गया’ या धर्तीवर स्वत:सह इतरांच्या आयुष्याशी खेळताना दिसतात.
कलम ४ अनुसार सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने कायदा २००३ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी आहे. अन्न व प्रशासन विभागाने वर्षभरात डझनभर कारवाया केल्या आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. नव्या सुधारीत कायद्यानुसार एक हजारांपर्यंत दंडाची तरतूद आहे. अन्न व प्रशासन विभागातर्फे मंगळवारपासून सार्वजनिक ठिकाणी ‘धुम्रपान ड्राईव्ह’ राबविण्यात येणार आहे. तसे निर्देश असल्याचे अन्न प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद देशपांडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
‘पॅसिव्ह’ स्मोकिंगमुळे अनेक आजार
शहर ‘पॅसिव्ह’ स्मोकिंगच्या विळख्यात सापडले आहे. सार्वजनिक ठिकाणी (सिगारेट) धुम्रपान करण्यात येते. ‘अ‍ॅक्टिव्ह’ स्मोकिंग करणारा कार्बनडाय आॅक्साईड फुफ्फुसामध्ये जमा करतो त्याला अनेक आजारही जडतात. तसेच धुराच्या माध्यमातून तो सिगारेटचा धूर बाहेर सोडतो. बाजूला उभा असलेल्या व्यक्तिला श्वासोच्छवासादरम्यान विनाकारण हा धूर अप्रत्यक्षपणे आत घ्यावा लागतो. त्यामुळे १० टक्के आजार त्यांना जडू शकतात. खोकला, फुफ्फुसाचे आजार व शेवटच्या स्टेजमध्ये कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, सर्वच लोकांना असे आजार जडतातच असे नाही, असे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी श्यामसुंदर सोनी यांनी सांगितले.

ब्राँकायटीसचीही शक्यता
सतत (सिगारेट) धूम्रपान केल्याने छातीचा कर्करोग होऊ शकतो. अस्थमाचा आजारही जडू शकतो. सिगारेट मध्ये निकोटिन असते. ते शरीरात साचून राहते. त्यामुळे लंग कॅन्सरही होऊ शकतो. सतत सिगारेट ओढल्याने ब्राँकायटीस (छातीचे आजारे) होऊ शकतो, असे शल्यविशारद तज्ज्ञ प्रवीण बिजवे यांनी सांगितले.

सिगारेटचा धूर लहान मुलांच्या फुफ्फुसात गेल्यास त्यांची सहनशीलता कमी असल्यामुळे त्यांना दमा, खोकला होऊ शकतो. कधी-कधी ते नकळत आजारी होतात.
- अद्वैत पानट,
बालरोगतज्ज्ञ

मग कारवाई
का नाही?
सर्व राजपत्रित वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांना धुम्रपान करणाऱ्यांविरुद्ध कारवार्ई करण्याचा अधिकार आहे. मग कारवाई का होत नाही? असा प्रश्न पडतो. पोलीस, अन्न-प्रशासन विभागाचे अधिकारी, महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, रेल्वे स्टेशन प्रमुख, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापक, प्राचार्यांना धुम्रपान करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा अधिकार आहे. तथापि हे सर्व अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात.

पोलिसांना आदेश देऊ. सार्वजनिक ठिकाणी कुणी धुम्रपान करीत असेल तर अन्न व प्रशासन विभागाचा सहभाग घेऊन कारवाई करण्यात येईल. हुक्कापार्लर असतील तर ते तपासण्यात येतील.
- दत्तात्रेय मंडलिक
पोलीस आयुक्त, अमरावती

सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार आहे. अन्न, प्रशासन विभागाच्यावतीने १८ ते २३ जानेवारी दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
- मिलिंद देशपांडे, सहाय्यक आयुक्त,अन्न प्रशासन विभाग, अमरावती

आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करणाऱ्यांविरुध्द कारवाई झाली नाही. स्मोकिंगमुळे कर्करोगासारखे आजार होण्याची शक्यता असते. पण, सर्वांनाच होतात असे नाही.
- श्यामसुंदर सोनी, आरोग्य अधिकारी, महापालिका

Web Title: Amravati is known for its passive smoking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.