अमरावतीत विधी अभ्यासक्रमाचा व्हाट्सॲपवर पेपर लीक; पोलिसांनी ताकीद देऊन सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2023 07:06 PM2023-05-20T19:06:12+5:302023-05-20T19:06:55+5:30
Amravati News येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत उन्हाळी २०२३ परीक्षेत विधी अभ्यासक्रमाच्या लॉ ट्रस्ट विषयाचा द्वितीय सत्राच्या चवथे सेमिस्टरचा शनिवारी मोबाइलद्वारे व्हॉट्सॲपवर पेपर लीक करण्यात आला.
अमरावती : येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत उन्हाळी २०२३ परीक्षेत विधी अभ्यासक्रमाच्या लॉ ट्रस्ट विषयाचा द्वितीय सत्राच्या चवथे सेमिस्टरचा शनिवारी मोबाइलद्वारे व्हॉट्सॲपवर पेपर लीक करण्यात आला. याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक प्रणीत सोनी, भूषण किसन हरकुट, किशोर पिंपळकर या तिघांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशीअंती नोटीस बजावून सोडून दिले.
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या केंद्रात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे शनिवारी सकाळी ९ ते १२ यादरम्यान विधी अभ्यासक्रमाच्या लॉ ट्रस्ट विषयाचा सेमिस्टर चवथे पेपर होता. मात्र, पेपर सुरू होताच तो मोबाइलवर पोहोचला. ही माहिती सायबर पोलिसांनी विद्यापीठ प्रशासनाला दिली. त्यानंतर सूत्रे हलली. गाडगेनगर पोलिस व्हीएमव्हीत पोहोचले आणि तिघांना
ताब्यात घेतले. हे तिघेही विधी अभ्यासक्रमाचे परीक्षार्थी होते. पेपर सुरू होताच तो व्हॉट्सॲपवर टाकण्यात आला, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. पेपर लीक झाल्याची माहिती मिळताच अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे या परीक्षा केंद्रावर पोहाेचल्या होत्या.