Amravati Lok Sabha Results 2024 : वंचित, बसपा फॅक्टर अमरावतीत फेल

By उज्वल भालेकर | Published: June 4, 2024 02:56 PM2024-06-04T14:56:15+5:302024-06-04T14:57:28+5:30

Amravati Lok Sabha Results 2024 : बसपाचे कॅडर वोटही निसटले, आंबेडकरांनाही नाकारले

Amravati Lok Sabha Results 2024 : Vanchit, BSP factor failed in Amravati | Amravati Lok Sabha Results 2024 : वंचित, बसपा फॅक्टर अमरावतीत फेल

Vanchit, BSP factor failed in Amravati

उज्वल भालेकर, अमरावती

Amravati Lok Sabha Results 2024 :अमरावती लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर तर बसपाचे संजयकुमार गाडगे या दोन्ही उमेदवारांना अमरावतीकरांनी नाकारल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडीने यंदा वेळेवर रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता. परंतु यंदा जिल्ह्यातील आंबेडकरी मतदारांनी मताचे विभाजन टाळण्यासाठी तसेच भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभवासाठी कॉँग्रेसच्या बळवंत वानखडे यांना एकगठ्ठा मतदान केल्याचे जाहीर होत असलेल्या निकालातून स्पष्ट होत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यंदा लोकसभा निवडणूक ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या या निर्णय महाविकास आघाडीला धक्का तर महायूतीला बळ देणारे ठरेल असा अंदाज वर्तविला जात होता. २०१९ मध्ये अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी ५६ हजारांच्या जवळपास मते घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. परंतु यंदा अमरावतीमधून प्रकाश आंबेडकर यांचे भाऊ आनंदराज आंबेडकर यांनी स्वत: रिपब्लिकन सेनेतून उमेदवारी दाखल केल्याने वंचितने त्यांना पाठिंबा दिला. तसेच बाबासाहेबांचा नातू म्हणून जिल्ह्यातील आंबेडकरी समाज त्यांच्या सोबत राहील अशी आशा आनंदराज आंबेडकरांना होती.

परंतु यंदा अमरावतीमधून नवनीत राणा यांचा पराभव करायचा आहे, त्यामुळे मताचे विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरी समाजाने आनंदराज आंबेडकरांना नाकारल्याचे त्यांना मिळालेल्या मतदानावरून स्पष्ट झाले आहे. सातव्या फेरीनंतरर आनंदराज आंबेडकर यांना ५६७८ इतके मते मिळाली होती. त्यामुळे शेवटच्या फेरी पर्यंत ते दहा हजारांचा आकडाही पूर्ण करतील की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे कॅडर वोट असलेल्या बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार संजयकुमार गाडगे यांनाही अमरावतीने नाकारले आहे. सातव्या फेरीनंतर त्यांना १६४३ मते मिळाली होती. २०१९ मध्ये बसपाच्या उमेदवाराला साडेबारा हजार मते मिळाली होती. परंतु यंदा बसपाच्या उमेदवाराला ५ हजारांचाही आकडा गाठणे शक्य झालेले नाही. याचाच फायदा म्हणून कॉँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना आघाडी देण्यास बौद्ध समाजाचे योगदान हे महत्वाचे ठरले आहे.

Web Title: Amravati Lok Sabha Results 2024 : Vanchit, BSP factor failed in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.