Amravati: २१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस, १३ तास १३ मिनिटे; दिवस मोठा अन् रात्र राहणार छोटी
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 18, 2023 04:40 PM2023-06-18T16:40:50+5:302023-06-18T16:41:13+5:30
Longest day of the year: पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळेमुळे २१ जूनला १३ तास १३ मिनिटांचा दिवस असतो. त्यामुळे हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस ठरणार आहे.
- गजानन मोहोड
अमरावती : पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळेमुळे २१ जूनला १३ तास १३ मिनिटांचा दिवस असतो. त्यामुळे हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस ठरणार आहे. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. याच दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होत असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.
पृथ्वीचे अक्षवृत्त साडेतेवीस डिग्रीच्या झुकाव्याने ११ हजार किमी प्रति तासाच्या गतीने पश्चिमेकडे पूर्व दिशेला फिरते. यासोबतच पृथ्वी आपल्या कक्षेतून १,०५,००० किमी प्रति तासाच्या वेगाने सुमारे ८९.४० कोटी किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातला जसा २१ जून हा सर्वात मोठा दिवस असतो, त्याप्रमाणे २२ डिसेंबर हा वर्षातला सर्वात लहान दिवस असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायन सुरू होत असते.
पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा कमी जास्त होत आहे. सन २००४ मध्ये दक्षिण भारतात जी त्सुनामी झाली होती. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चालल्याने ठरावीक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय घड्याळामध्ये लिप सेकंद ॲडजस्ट करावा लागतो, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने, हौशी खगोल अभ्यासक यांनी दिली. खगोलप्रेमी व जिज्ञासूंनी २१ जून या उत्तर गोलार्धातील सर्वात मोठ्या दिवसाचे प्रत्यक्ष कालमापन करावे व अनुभव घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.