Amravati: मेडिकल कॉलेजसाठी ‘एमयूएचएस’ त्रिसदस्यीय चमूने केली जागेची पाहणी
By उज्वल भालेकर | Published: October 28, 2023 08:03 PM2023-10-28T20:03:57+5:302023-10-28T20:04:32+5:30
Amravati: शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शनिवारी ‘एमयूएचएस’ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या त्री-सदस्यीय चमूने जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच डफरीन रुग्णालय परिसरातील आवश्यक जागेची पाहणी केली.
- उज्वल भालेकर
अमरावती - शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शनिवारी ‘एमयूएचएस’ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या त्री-सदस्यीय चमूने जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच डफरीन रुग्णालय परिसरातील आवश्यक जागेची पाहणी केली. महाविद्यालयासाठी निवडण्यात आलेली जागा योग्य आहे की नाही याचा अहवाल ही चमू ‘एमयूएचएसला’ सादर करणार आहे. या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष डॉ. समीर गाेलावार, सदस्य डॉ. पाशू शेख, सदस्य डॉ. रंजीत देशमुख यांचा समावेश असून पाहणीदरम्यान अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळेदेखील उपस्थित होते.
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्नित ४३० खाटांच्या रुग्णालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे १७ सप्टेंबर रोजी अर्ज सादर केला. त्यामुळे लवकरच आता आवश्यक पदस्थापना तसेच पहिल्या वर्षासाठी तीन विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक महाविद्यालयाचे नियोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ‘एमयूएचएस’च्या त्रिसदस्यीय समितीने ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी इर्विन रुग्णालयातील सर्व वाॅर्ड, ओटी, केंद्रीय प्रयाेगशाळा, आयसीयू विभागाची पाहणी केली. तर महाविद्यालयासाठी डफरीन रुग्णालय परिसरातील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, येथील वसतिगृह तसेच फार्मासिस्ट विभागाचे असलेले दोन मोठे हॉल त्याचबरोबर प्री फॅब हॉस्पिटल येथे पाहणी केली आहे. तसेच आवश्यकतेनुसार इतरही इमारतींची पाहणी या चमूने केली आहे. त्यामुळे या चमूने सादर केलेल्या अहवालानंतर पुढील हालचालींना वेग येणार असून, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची चमू जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात आकस्मिक भेट देण्याची शक्यता आहे.