अमरावती-मुंबई एक्स्प्रेस रद्दचा निर्णय मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 01:40 AM2019-04-05T01:40:10+5:302019-04-05T01:40:46+5:30
अमरावती-मुंबई एक्स्प्रेससह पॅसेजर गाड्या रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी रेल्वे प्रशासनाने घेतला होता. खासदार आनंदराव अडसूळ यांनी या निर्णयाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती-मुंबई एक्स्प्रेससह पॅसेजर गाड्या रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी रेल्वे प्रशासनाने घेतला होता. खासदार आनंदराव अडसूळ यांनी या निर्णयाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. परिणामी सायंकाळी अमरावती-मुंबई एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने मागे घेतला.
भुसावळ रेल्वे स्थानकावर विविध विकासकामांसाठी ५ ते २० एप्रिल दरम्यान आठ तासांचा मेगा ब्लॉक राहणार असल्याने अमरावती-बडनेराहून धावणाऱ्या मुंबई, सुरत, पुणेसह ४४ एक्स्प्रेस आणि ३४ पॅसेजर गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. मात्र, हा निर्णय अन्याय्य असल्याने तो तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करू, असा इशारा खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला होता. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याशी भ्रमणध्वनीहून त्यांनी संवाद साधला. रेल्वे मंत्रालयाने ही कामे करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे १२० दिवसांअगोदर प्रवाशांनी आरक्षण केले आहे. त्यामुळे ५ ते २० एप्रिल दरम्यान रद्द करण्यात आलेल्या ४४ मेल-एक्स्प्रेस आणि ३४ पॅसेंजर रद्द करू नये, अशी विनंती खासदार अडसूळ यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह रेल्वे बार्डांच्या सदस्यांकडे केली होती. अखेर खासदार अडसूळ यांच्या तक्रारीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने अमरावती-मुंबई एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी मागे घेतला. मात्र, अमरावती-सुरत व इतर ३४ पॅसेजर गाड्यांच्या फेऱ्या ५ ते २० एप्रिल दरम्यान रद्द राहतील. अमरावती-पुणे एक्स्प्रेस १८ एप्रिल रोजी रद्द राहील, असा सुधारित आदेश रेल्वे बोर्डाने विभागीय प्रबंधकांना उशिरा सायंकाळी पाठविला.