आजपासून अमरावती-मुंबई एक्सप्रेस धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:11 AM2021-07-01T04:11:12+5:302021-07-01T04:11:12+5:30
अमरावती : पश्चिम विदर्भातील रेल्वे प्रवाशांच्या पसंतीत खरी ठरलेली अमरावती-मुंबई एक्स्प्रेस तब्बल ६५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरूवार, १ जुलैपासून नियमित ...
अमरावती : पश्चिम विदर्भातील रेल्वे प्रवाशांच्या पसंतीत खरी ठरलेली अमरावती-मुंबई एक्स्प्रेस तब्बल ६५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरूवार, १ जुलैपासून नियमित धावणार आहे. मात्र, पहिल्याच दिवशी ही गाडी मुंबईकडे हाऊसफुल्ल धावणार असल्याने अनेकांना आरक्षण मिळाले नाही, हे विशेष.
कोरोनाची दुसरी लाट येताच रेल्वे बोर्डाने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यात अमरावती- मुंबई ही गाडी २७ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली होती. तसेच अमरावती- सुरत, अमरावती -जबलपूर इंटरसिटी एक्स्प्रेस, अमरावती-भुसावळ आणि अमरावती-नागपूर पॅसेंजरदेखील आतापर्यंत बंद आहे. मात्र, मुंबईकडे ये-जा करण्यासाठी अतिशय सोयीची असलेली दुसऱ्या लाटेत प्रवाशांअभावी अमरावती-मुंबई एक्स्प्रेस रेल्वे गाडी रद्द करण्यात आल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनीदेखील रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पत्र देऊन अमरावती-मुंबई एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर रेल्वे बोर्डाने १ जुलैपासून ही गाडी नियमितपणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
----------
असे आहे गुरुवारी मुंबई एक्स्प्रेसचे वेटिंग
प्रथम श्रेणी- ३
द्धितीय श्रेणी- १
तृतीय श्रेणी- १४
सामान्य आरक्षण श्रेणी- ९५
----------------------
विदर्भातील प्रवाशांसाठी अमरावती-मुंबई एक्स्प्रेस नियमित सुरू असणे गरजेचे आहे. कोरोना काळात प्रवाशांअभावी ती २७ एप्रिल रोजी बंद करण्यात आली होती. मात्र, ही गाडी सुरू करावी, यासाठी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पत्राद्धारे मागणी केली होती. अखेर मुंबई एक्स्प्रेस सुरू होत असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- नवनीत राणा, खासदार