आता यंत्राद्वारे दहा रुपयात मिळणार कापडी पिशवी
By प्रदीप भाकरे | Published: February 23, 2023 05:14 PM2023-02-23T17:14:38+5:302023-02-23T17:16:53+5:30
स्वच्छ सर्वेक्षण : स्वच्छता विभागाची ‘से नो टू प्लास्टिक’ मोहीम
अमरावती : स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा यांच्या १४७ व्या जयंती निमित्त महापालिकेत यंत्राद्वारे कापडी पिशवी मिळवण्याचे मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते गुरुवारी त्या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. बाजारात २० रुपयांमध्ये उपलब्ध असलेली कापडी पिशवी महापालिकेत दहा रुपयांमध्ये मिळणार आहे.
महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच उपायुक्त तथा वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. सीमा नैताम यांच्या पुढाकाराने नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा, या उद्देशाने ती मशीन कार्यान्वित करण्यात आली.
स्वच्छता विभागामार्फत स्वच्छतेचे संदेश देणारे पथनाट्याचे आयोजनसुद्धा करण्यात आले. यावेळी उत्तर झोन क्र. १ चे सहायक आयुक्त भूषण पुसतकर, समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय बुरे, कुंदन हडाले, राजेश राठोड, स्वच्छ भारत अभियान समन्वयक श्वेता बोके, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणेचे प्रशिक भातकुले तसेच मनपा अधिकारी, कर्मचारी, स्वास्थ्य निरीक्षक व सफाई कामगार उपस्थित होते.