अमरावती महापालिकेतील ३७८ कोटींचा प्रकल्प राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 01:13 PM2021-01-29T13:13:23+5:302021-01-29T13:13:54+5:30
तत्कालिन आयुक्त निपाणे आणि विद्यमान आयुक्त रोडे यांच्या नेतृत्त्वात यशोभरारी
अमरावती : प्रत्येक कुटुंबाजवळ स्वत:चे घर असावे, या संकल्पोतून ‘प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत महापालिकेचा ३७८ कोटींचा सर्वात मोठा प्रकल्प राज्यात अव्वल ठरला आहे. याअंतर्गत घटक ३ मध्ये ८६० सदनिकांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. घटक ४ मध्ये ६,५२४ लाभार्थ्यांच्या कामांना शासनाची मंजुरी मिळालेली आहे व आतापर्यंत १,७५८ घरे पूर्ण झालेली आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात घटक क्रमांक ३ (खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे) याअंतर्गत ८६० सदनिकांचे बांधकाम तसेच घटक क्रमांक ४ मध्ये (आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील लाभार्थीद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान) याअंर्तगत ६,५२४ लाभार्थ्यांचे घरकुल बांधण्यास राज्य व केंद्र शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांची किंमत ३७८ कोटीं असून कामे प्रगतीत आहेत.
या दोन्ही घटकांत लाभार्थींना घरकुल बांधण्यास २.५० लाखांचे अनुदान देण्यात येत आहे. यात केंद्र १.५० लाख व राज्य शासनाचा हिस्सा १ लाखांचा आहे. यात बांधकामाचे चटई क्षेत्रफळ ३० चौरसमीटर म्हणजेच किमान ३२३ चौरस फूट आवश्यक आहे. या योजनेकरिता तत्कालीन आयुक्तांसह विद्यमान आयुक्त प्रशांत रोडे यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने या योजनेची कामे आता प्रगतीत असल्याचे उपअभियंता सुनील चौधरी यांनी सांगितले.
आतापर्यंत प्राप्त अर्ज
घटक १ मध्ये १५,६६९
घटक २ मध्ये ४,६२६
घटक ३ मध्ये २०,०५९
घटक ४ मध्ये २६,५२६
एकूण प्राप्त अर्ज ६६,८८०
असे आहेत चार घटकया योजनेत चार घटक आहेत. यात घटक क्रमांक १ मध्ये जमिनीचा साधनसंपती म्हणून वापर करून त्यावरील झोपडपट्टयांचा आहे तेथेच पुनर्विकास करणे, घटक क्रमांक २ मध्ये कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे, घटक ३ मध्ये खासगी भागीदारीत परवडणाऱ्या घरांची निर्मिती व घटक ४ मध्ये आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान.
बॉक्स
६.५० ते ८.५० लाखांपर्यंत सदनिका
सद्यस्थितीत मौजा म्हसला १५६ सदनिका, बडनेरा १०५, निंबोरा ४४, नवसारी ८६ रहाटागाव ४२ व बेनोडा येथे ६४ अशा एकूण ४९७ सदनिकांचे काम प्रगतीत आहे. ही सदनिका ९ ते ११.५० लाखांपर्यंत अपेक्षित आहे. यात लाभार्थ्यांचा हिस्सा ६.५० ते ८.५० लाखांपर्यंत राहील. म्हसला येथील ६० सदनिकांचे काम पूर्णत्वाला आले असून, पुढील महिन्यात त्यांना ताबा देण्यात येणार आहे.
बॉक्स
घटक ४ मध्ये ६५२४ लाभार्थ्यांना लाभ
आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान या घटकात सन २०१७-१८ मध्ये ३५६१ लाभार्थ्यांना २५.२१ कोटी, सन २०१८-१९ मध्ये १८०८ लाभार्थ्यांना १६.११ कोटींचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. सन २०१९-२० मध्ये ११५५ लाभार्थ्यांकरिता ११.३७ कोटींचा निधी प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.
घटक ३ अंतर्गत ८६० सदनिका पूर्ण करणे व लाभार्थ्यांना ताबा देणे याकडे लक्ष आहे. यासोबतच घटक ४ मधील लाभार्थ्यांनी त्यांचे घरकुलचे बांधकाम लवकर पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. सर्वच घटकातील लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी महापालिकेची यंत्रणा प्रयत्नशील आहे.- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका, अमरावती