तीन सदस्यीय प्रभाग प्रणाली कुणाच्या पथ्यावर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 02:02 PM2021-11-02T14:02:08+5:302021-11-02T14:09:36+5:30
कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत अमरावती महापालिकेतही लोकसंख्येच्या आधारे नगरसेवकांची संख्या वाढण्याबाबत निर्णय झाला. त्याअनुषंगाने आताच्या ८७ ऐवजी ११ नगरसेवकांची वाढ होऊन ९८ सदस्य सभागृहात जातील, असे संकेत आहेत.
अमरावती : राज्य शासनाने महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रणालीने घेण्याचा निर्णय जाहीर केला. आता पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक होणार असून ९८ नगरसेवक निवडीसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे तीन सदस्यीय प्रभाग प्रणाली कोणत्या राजकीय पक्षाच्या पथ्यावर पडणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
गत आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत अमरावती महापालिकेतही लोकसंख्येच्या आधारे नगरसेवकांची संख्या वाढण्याबाबत निर्णय झाला. त्याअनुषंगाने आताच्या ८७ ऐवजी ११ नगरसेवकांची वाढ होऊन ९८ सदस्य सभागृहात जातील, असे संकेत आहेत. मात्र, तीन सदस्यीय प्रणाली कशी असेल, कोणत्या वाॅर्डात कोणती कॉलनी, वस्त्यांचा समावेश राहील, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
राज्य शासनाने तीन सदस्यीय प्रणालीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला असला तरी अध्यादेश अद्याप जारी झाला नाही. दिवाळीनंतर अध्यादेश प्राप्त झाल्यानंतर वाॅर्डांची नव्याने रचना केली जाईल, असे संकेत आहेत. तथापि, नवीन प्रभाग प्रणाली तूर्त कोणत्या राजकीय पक्षाच्या पथ्यावर पडेल, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.
निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता?
महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होण्याचे संकेत आहेत. मात्र, वॉर्ड रचना, सीमांकन, ओबीसी आरक्षणाचा तिढा, मतदार यादीवर आक्षेप, सुनावणी आदी बाबींमुळे ती लांबणीवर पडणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणूक लांबणीवर पडेल, असे चिन्हे दिसून येत आहेत.
इच्छुक उमेदवारांना वॉर्ड रचनेची प्रतीक्षा
अमरावती महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नगरसेवक बनण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या इच्छुक उमेदवारांना वॉर्ड रचना कशी, केव्हा होते, याकडे नजरा लागल्या आहेत. नगरसेवकांची संख्या अकराने वाढणार असल्याने अनेकांचे मनसुबे बळावले आहेत. राजकीय पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी आतापासूनच येरझारा सुरू झाल्या आहेत.