अमरावती महापालिका ओबीसी आरक्षण सोडत : माजी महापाैरांसह दिग्गजांसमोर लढण्यासाठी ‘ओपन’चा पर्याय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 02:45 PM2022-07-30T14:45:01+5:302022-07-30T14:48:49+5:30
ओपनमधून लढा अन्यथा राहा ‘माजी नगरसेवक’
अमरावती : महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये एकूण ९८ सदस्यांमध्ये २६ जागा ओबीसींसाठी राखीव असणार आहेत. त्या आरक्षण सोडतीवर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. ओबीसींसाठी आरक्षित झालेल्या प्रभागनिहाय जागा पाहता माजी महापाैरांसह दिग्गजांना सर्वसाधारण जागेवरून लढावे लागणार आहे. मात्र, त्या सर्वसाधारण जागेसाठीदेखील विविध राजकीय पक्षांचे इच्छुक समोरासमोर ठाकण्याचे संकेत आहेत. सर्वसाधारण सर्वाधिक चुरस पाहायला मिळणार आहे. काही जागा ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने ओबीसींमधील दिग्गज कुटुंबातील महिलेला संधी देता येईल का, याची चाचपणी करीत आहेत.
राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोेगाने २२ जुलैच्या आदेशानुसार, ओबीसींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, शुक्रवारी २७ टक्के आरक्षणानुसार अमरावती महापालिकेत एकूण २६ जागा ओबीसींसाठी राखीव झाल्या. मात्र, आरक्षण सोडतीने अनेकांंच्या तोंडचे पाणी पळविले आहे. विशेष म्हणजे ३१ मे रोजी काढलेल्या आरक्षणाचा जेवढा फटका बसला नव्हता, त्यापेक्षा मोठा फटका ओबीसी आरक्षणामुळे दिग्गजांना बसला आहे.
माजी महापाैरांची गोची
माजी महापौर चेतन गावंडे यांची मोठी गोची झाली आहे. तेथे पहिली जागा ओबीसी महिला, दुसरी जागा सर्वसाधारण महिला तर तिसरी जागा सर्वसाधारण आहे. त्यामुळे सर्वसाधारणमधून तुषार भारतीय उमेदवार असतील. पक्ष कुणाला एकाला तिकीट देईल. त्यामुळे चेतन गावंडे यांच्यासमोर त्यांच्या कुटुंबातील महिलेला उमेदवार करण्याचा पर्याय असेल. तेथे सर्वसाधारणमध्ये आ. राणा यांचे कट्टर समर्थक सचिन भेंडे व तुषार भारतीय अशी लढत होण्याचे संकेत आहेत.
दोन माजी महापौर आमने-सामने
विलासनगरमधील तीनपैकी एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे भाजपने संजय वानरे यांच्या तुुलनेत माजी महापौर संजय नरवणे यांच्या पारड्यात वजन टाकल्यास त्यांच्यासमोर माजी महापौर प्रवीण काशीकर उभे ठाकू शकतात, तर प्रा. प्रदीप दंदे यांनादेखील त्याच जागेवरून लढावे लागेल. तेथील उर्वरित दोन जागा ओबीसी महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आहेत.
विलास इंगोले सेफ झोनमध्ये
जुन्या आरक्षणानुसार, माजी महापौर विलास इंगोले व माजी स्थायी समिती सभापती विवेक कलोती समोरासमोर भिडणार होते. मात्र, आता बुधवारा प्रभागातील एक जागा ओबीसीसाठी राखीव झाल्याने इंगोले व्हर्सेेस कलोती ही लढत टळणार आहे. तेथील माजी नगरसेविका सुनीता भेले, रतन डेंडुले व विवेक कलोती हे सर्वसाधारण जागेवर लढू शकतात.