Amaravati Murder Case : मास्टरमाईंडच्या ‘एनजीओ’चे कनेक्शन तपासणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 11:22 AM2022-07-04T11:22:12+5:302022-07-04T11:32:17+5:30

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचे शहर पोलिसांनी शनिवारी स्पष्ट केल्याने अख्ख्या देशाची नजर अमरावतीवर स्थिरावली आहे.

Amravati Murder Case : Irfan Shaikh Mastermind behind Umesh Kolhe Murder is the Director of an Ngo | Amaravati Murder Case : मास्टरमाईंडच्या ‘एनजीओ’चे कनेक्शन तपासणार!

Amaravati Murder Case : मास्टरमाईंडच्या ‘एनजीओ’चे कनेक्शन तपासणार!

googlenewsNext
ठळक मुद्देएनआयएच्या तपासाला वेग : मीडियाच्या केंद्रस्थानी अमरावती

अमरावती : मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या निर्घृण हत्याप्रकरणी नागपुरातून अटक केलेल्या शेख इरफान शेख रहीम (वय ३५, रा. कमेला ग्राऊंड, अमरावती) याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अमरावतीमध्ये तो रहबर हेल्पलाईन नामक स्वयंसेवी संस्था चालवित असल्याचे उघड झाल्यानंतर त्याचे देशविघातक शक्तीशी संबंध आहेत की कसे, यादृष्टीने शहर कोतवाली पोलीस व एनआयएने समांतर तपास चालविला आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचे शहर पोलिसांनी शनिवारी स्पष्ट केल्याने अख्ख्या देशाची नजर अमरावतीवर स्थिरावली आहे.

शेख इरफान शेख रहिम याच्या सांगण्यावरून आपण उमेश कोल्हे यांची रेकी करून गळा कापल्याची कबुली अन्य पाच आरोपींनी दिली होती, तर त्याच पाच आरोपींच्या कबुली जबाबानुसार, शनिवारी पहाटे डॉ. युसूफ खान बहादूर खान याला अटक केली, तर सायंकाळी शेख इरफान याला नागपुरातून अटक करण्यात आली. रात्रीच्या सुमारास त्याला अटक करून कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले, तर रविवारी दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले.

शेख इरफान हा काही वर्षांपासून ‘रहबर हेल्पलाईन’ चालवत होता. त्या माध्यमातून त्याने काही रुग्णवाहिका घेतल्या तथा कोरोनाकाळात अनेकांना मदतीचा हातदेखील दिला, अशी माहिती समोर आली. त्याअनुषंगाने कोतवाली पोलिसांनी धर्मदाय आयुक्तांकडून रहबर हेल्पलाईनच्या नोंदणीबाबत व एकूणच व्यवहाराबाबत तातडीने माहिती मागविली आहे. कोरोनाकाळात मदतीचा हात दिल्याने रहबर हेल्पलाईनची ‘फॅन फॉलोईंग’ विस्तारल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. त्या दृष्टीने फंडिंग नेमकी कुणी केली, हेल्पलाईनचा उद्देश, सदस्यांची संख्या व एकूणच भूमिकेची झाडाझडती घेतली जात आहे. आरोपींपैकी काहीजण शेख इरफानच्या एनजीओचे सदस्य असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आहे.

तपास अद्यापपर्यंत पोलिसांकडेच

कोल्हे हत्याकांडाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे ट्वीट केंद्रीय गृहमंत्रालयाने केले असले, तरी अद्यापपर्यंत तो तपास एनआयएकडे हँडओव्हर झालेला नाही. रविवारी कोतवाली पोलिसांनीच शेख इरफानला न्यायालयात हजर केले. मात्र, एनआयएची चमू शहरात तळ ठोकून आहे. त्यांनी गुप्तपणे आपला तपास चालविला आहे, तर आरोपींपैकी कुणाचे देशविघातक शक्तीशी, संघटनेशी संबंध आहे का, त्यांच्याकडे काही दस्तावेज, लेख, साहित्य मिळते का, हे शोधण्यासाठी आरोपींच्या घराची झाडाझडती घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. कोल्हे हत्याप्रकरणाचे ‘इंटरनॅशनल लिंकेजेस’ एनआयए तपासणार असल्याची माहिती आहे.

डॉ. युसूफ खान अंत्ययात्रेत सहभागी

आरोपी डॉ. युसूफ खान हा व्यवसायाने पशुवैद्यक आहे. कोल्हे यांच्या व्हेटरनरी मेडिकलचा तो जुना ग्राहक होता. त्यांचे घरगुती संबंध होते. मात्र, थकलेल्या उधारीवरून काही दिवसांपूर्वी त्याचे कोल्हे यांच्याशी बिनसले होते, अशी माहिती समोर आली आहे. उमेश कोल्हे यांनी ज्या ग्रुपमध्ये नूपुर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर वा फॉरवर्ड केली, त्या ग्रुपमध्ये तोदेखील होता. त्यानेच त्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून ते शेख इरफानला पाठविल्याचे निष्पन्न झाले. शंका येऊ नये म्हणून तो उमेश कोल्हे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला होता, ही माहितीदेखील उघड झाली आहे.

Web Title: Amravati Murder Case : Irfan Shaikh Mastermind behind Umesh Kolhe Murder is the Director of an Ngo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.