जिल्हा परिषदेत ९१ कर्मचारी लेटलतिफ; सीईओंची सरप्राईज व्हिजीट
By जितेंद्र दखने | Published: March 21, 2023 07:53 PM2023-03-21T19:53:27+5:302023-03-21T19:53:45+5:30
विभागप्रमुखांवर सोपविली कारवाईची जबाबदारी; संपानंतरच परतताच कारवाईचा बडगा.
अमरावती: जिल्हा परिषदेतील कर्मचारी सलग सात दिवसांच्या संपानंतर मंगळवारी कामावर परतले आहेत. अशातच मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंगळवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी मुख्यालयातील विविध विभागांत आकस्मिक भेट देऊन अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थितीची पाहणी केली. यावेळी सीईओंना ९१ अधिकारी व कर्मचारी कार्यालयात गैरहजर असल्याचे आढळले आहेत. त्यामुळे या गैरहजर कर्मचाऱ्यांवर विभागप्रमुखांनी कारवाई करण्याचे निर्देश सीईओ पंडा यांनी दिले आहेत.
शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी निश्चित केलेली आहे.अशातच सीईओंनी अचानक विविध विभागांत प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना ९१ कर्मचारी कार्यालयीन वेळेवर हजर नसल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे खातेप्रमुख म्हणून आपण कार्यालयीन वेळेमध्ये उपस्थित राहून आपल्या अधिनस्त कर्मचारी कार्यालयीन वेळेवर उपस्थित राहण्याकरीता दैनंदिनरित्या त्यांचे हजेरी रजिस्टरची तपासणी करणे ही आपल्या जबाबदारी आहे.याबाबत आपणास वेळोवेळी यापूर्वी निदर्शनास आणून दिले आहे. असे असताना विविध विभागांत सीईओंनी प्रत्यक्ष भेटी दिली असता गैरहजर कर्मचारी संख्या लक्षात घेता.गैरहजर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेवर हजर नसल्याने ही बाब प्रशासकीयदृष्ट्या गंभीर आहे.त्यामुळे आपल्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यावर योग्य कारवाई करण्याचे निर्देश या लेखी आदेशात सीईओ अविश्यांत पंडा यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत.
विभागनिहाय गैरहजर कर्मचारी
आराेग्य १०, शिक्षण विभाग माध्यमिक,०२,प्राथमिक ०५, भातकुली पाणीपुरवठा ०१, नरेगा ०३, वित्त विभाग २४,पा.व.स्व ०७,सिंचन ०३, बांधकाम ०३,बांधकाम उपविभाग क्र.०५,उपविभाग क्र.२ मध्ये ०३, महिला व बालकल्याण ०१, समाजकल्याण ०२, कृषी ०२, पंचायत ०२, टीएमओ अमरावती ०७, सामान्य प्रशासन विभाग ०३ असे ९१ कर्मचारी गैरहजर होते.