Amravati: वडील नाहीत, आई करते घरकाम अन् तो करतो मजुरी, मनपा शाळेत शिकणाऱ्या मंगेशने दहावीत घेतले ८४ टक्के गुण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 08:27 PM2024-05-27T20:27:53+5:302024-05-27T20:28:12+5:30
Amravati SSX Exam Result: सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी एक-दुसऱ्याला पेढे भरवून पास झाल्याचा आनंदोत्सव साजरा करतानाचे चित्र शहरात सर्वत्र पहायला मिळत होते. परंतु महापालिका शाळेत शिकणारा मंगेश राजगुरे मात्र आपल्या निकालाचा आनंदोत्सव साजरा करू शकला नाही. घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे निकालाच्या दिवशीहीत्याला मजुरीला जावे लागले.
- उज्वल भालेकर
अमरावती - सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी एक-दुसऱ्याला पेढे भरवून पास झाल्याचा आनंदोत्सव साजरा करतानाचे चित्र शहरात सर्वत्र पहायला मिळत होते. परंतु महापालिका शाळेत शिकणारा मंगेश राजगुरे मात्र आपल्या निकालाचा आनंदोत्सव साजरा करू शकला नाही. घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे निकालाच्या दिवशीहीत्याला मजुरीला जावे लागले. मंगेशने दहावीच्या परीक्षेमध्ये आपल्या परिस्थितीवर मात करत ८४ टक्के गुण मिळविले असून तो महापालिकेच्या सर्व शाळेतून प्रथम आला आहे. त्याने मिळविलेल्या या यशाचे कौतूक महापालिका शिक्षणाधिकारी प्रकाश मेश्राम यांनी देखील केले आहे.
दहावीचा निकाल हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा असतो. अशाच प्रकारचा कलाटणी देणारा निकाल हा टारखेडा भाजीबाजार परिसरातील रहिवासी असलेला मंगेश राजगुरे या विद्यार्थ्यांचा लागला आहे. मंगेश हा बुधवारा परिसरातील महापालिका मराठी कन्या शाळेतील विद्यार्थी आहे. मंगेशचे वडील नसून त्यांचे निधन झाले आहे. तर आई ही मोलकरीन म्हणून इतर लोकांच्या घरी काम करते. मंगेशला एक मोठा भाऊ असून तो देखील मजुरीचे काम करतो. हालाकीच्या परिस्थितीमुळे मंगेशचे संपूर्ण कुटुंब हे त्याच्या आत्याच्या घरी राहतात. सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आपल्या निकालाचा आनंदोत्सव साजरे करत असताना मंगेश मात्र रोजच्या भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी कामाला गेला होता. यावेळी शाळेतील शिक्षकांनी त्याला कॉल करून त्याला दहावीमध्ये ८४ टक्के गुण मिळाल्याची माहिती दिली.
कोणत्याही प्रकारचे खासगी क्लासेस न करता घरीच शाळेत शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासावर रोज तीन ते चार तास अभ्यास करून त्याने हे यश संपादन केले आहे. महापालिकेच्या सर्व शाळेतून तो सर्वाधिक गुण घेऊन प्रथम आला आहे. मंगेशला आपले उच्च शिक्षण हे विज्ञान विषयात करायचे आहे. परंतु घरची परिस्थिती लक्षात घेता वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊ असे त्याने लोकमतशी बोलतांना सांगितले.