१२ बाजार समितींसाठी आजपासून उमेदवारी अर्ज; निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 26, 2023 04:39 PM2023-03-26T16:39:55+5:302023-03-26T16:40:32+5:30
जिल्ह्यातील १२ बाजार समिती निवडणुकीसाठी सोमवार म्हणजेच, २७ मार्चपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे
अमरावती : बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाद्वारा १२ निवडणूक निर्णय अधिकारी शनिवारी नियुक्त करण्यात आले आहे. सहायक निबंधक असलेल्या या अधिकाऱ्यांद्वारा निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाईल. या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघातील १५ पदांसाठी १० गुंठे क्षेत्र धारण करणारे शेतकरी उमेदवार राहू शकतात.
जिल्ह्यातील १२ बाजार समिती निवडणुकीसाठी सोमवार म्हणजेच, २७ मार्चपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाचे मान्यतेने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर यांनी नांदगाव खंडेश्वर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राजेश भुयार, अचलपूर- राजेश यादव, दर्यापूर- स्वाती गुडधे, चांदूर रेल्वे- प्रीती धामणे, अंजनगाव सुर्जी- भालचंद्र पारिसे, तिवसा- गजानन डावरे, अमरावती- सचिन पतंगे, चांदूरबाजार- आर.एम. मदारे, धामणगाव रेल्वे- अच्युत उल्हे, मोर्शी- के.पी. धोपे, धारणी- अनिरुद्ध राऊत व वरुड बाजार समितीसाठी सहदेव केदार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स व साथरोग अधिनियमाचे पालन निवडणूक प्रक्रियेदरम्यान करण्यात येणार असल्याचे सहकार विभागाने सांगितले.
१८ संचालक पदांसाठी निवडणूक
प्रत्येक बाजार समितीमध्ये १८ संचालक निवडल्या जाणार आहे. यामध्ये सेवा सहकारी मतदारसंघात सर्वसाधारण प्रवर्गात सात, महिला दोन, ओबीसी एक व एनटी व्हीजेसाठी एक असे सात, ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारण दोन, एससी, एसटी एक, आर्थिक दुर्बल घटक एक, अडते व व्यापारीमध्ये दोन व हमाल, मापारीमध्ये एक संचालक राहील.