अमरावती-परतवाडा-धारणी रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 05:00 AM2022-07-18T05:00:00+5:302022-07-18T05:00:29+5:30

संपूर्ण विदर्भात मेट्रोचे जाळे विणण्याचे काम हाती घेतले जाईल, असे ना. गडकरी यांनी सांगितले. आठ डब्यांची मेट्रो असणार आहे. त्याकरिता रेल्वे प्रशासनाने तयारी दर्शविली आहे. ताशी १४० ते १५० किमीचा मेट्रोचा वेग राहणार असून, यंदा डिसेंबरअखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. गोंदिया, भंडारा, वडसा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला, शेगाव असादेखील पुढील टप्पा मेट्रोचा राहील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. 

Amravati-Patwara-Dharni road will be a national highway | अमरावती-परतवाडा-धारणी रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग

अमरावती-परतवाडा-धारणी रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती-परतवाडा-धारणीनंतर बैतुल असा हा राज्यमार्ग येत्या काळात राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आमदार प्रवीण पोटे हे मला दोनदा भेटून गेले. सतत त्यांचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे दिली. 
गडकरी हे एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, डॉ. अविनाश चौधरी यांनी अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भिजतघोंगडे  असल्याची बाब त्यांच्या पुढ्यात ठेवली. तेव्हा गडकरींनी शासकीय मेडिकल कॉलेज स्थापनेबाबतचा प्रवास उलगडला. यावेळी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद निरवणे यांनी गडकरींकडे आराेग्य विभागात समस्यांची फाईल सादर केली. तथापि, अमरावती-परतवाडा, धारणी पुढे बैतुलपर्यंत हा राज्य मार्ग लवकरच राष्ट्रीय महामार्ग होईल, त्याअनुषंगाने निधीची तरतूद केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नांदगाव पेठ एमआयडीसीतील भारत डायनामिक्स कारखाना सुरू होणार अथवा नाही, याबाबतही गडकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमरावती-यवतमाळ या राज्य मार्गाची अवस्था कधी सुधारणार, या प्रश्नावर गडकरी यांनी हा मार्ग राज्य सरकारच्या मालकीचा आहे; त्यामुळे या मार्गाची जबाबदारी राज्य सरकारकडे असेल, असे ते म्हणाले. यावेळी आमदार प्रवीण पोटे, भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर, डॉ. अविनाश चौधरी, दिनेश सूर्यवंशी, जयंत डेहनकर आदी उपस्थित होते. 

म्हणून झाले नाही गडकरींच्या विमानांचे लॅन्डिंग 
ना. नितीन गडकरी हे रविवारी अमरावती दौऱ्यावर येताना त्यांनी विमानाने येण्याचे नियोजन केले होते. मात्र, बेलाेरा विमानतळाची धावपट्टी ही विमानांच्या लॅन्डिंगसाठी सध्या तयार नाही, बरीच कामे प्रलंबित असल्याची माहिती ना. गडकरींना प्रशासनाने दिली. त्यामुळे नागपूर येथून बाय रोड यावे लागले, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, गत काही दिवसांपूर्वी बेलोरा विमानतळासाठी ७५ कोटी रुपये मंजूर झाले होते. या निधीतून कामे सुरू झाली अथवा नाही, हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

नितीन गडकरी यांची माहिती, निधीची करणार तरतूद

गडकरींच्या दौऱ्याबाबत विचारणा नाही : निवासी उपजिल्हाधिकारी
ना. नितीन गडकरी हे रविवारी विमानाने अमरावती येथे येणार असल्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे विचारणा झाली नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बेलोरा विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू आहे. कोविडकाळात ते बंद होते. सध्या धावपट्टीवर हेलिकॉप्टरही उतरू शकत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने आपत्कालीन स्थितीत हेलिकॉप्टर बोलावल्यानंतर ते विमानतळावर उतरू शकत नाही, हे वास्तव आहे. जिल्हा प्रशासनाने मे महिन्यात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला धावपट्टी सुव्यवस्थित करण्याबाबतचे पत्र दिले होते, असे बिजवल म्हणाले. हल्ली विमानतळावरील विकासकामे बंद असून ऑक्टोबरनंतर सुरू होतील. 

नागपूर-अमरावती-नरखेड मेट्रो लवकरच 
मेट्रोचा प्रवास हा बसपेक्षा स्वस्तात पडतो. त्यामुळे अमरावती-नागपूर-नरखेड असा नवा मेट्रोचा मार्ग प्रस्तावित आहे. संपूर्ण विदर्भात मेट्रोचे जाळे विणण्याचे काम हाती घेतले जाईल, असे ना. गडकरी यांनी सांगितले. आठ डब्यांची मेट्रो असणार आहे. त्याकरिता रेल्वे प्रशासनाने तयारी दर्शविली आहे. ताशी १४० ते १५० किमीचा मेट्रोचा वेग राहणार असून, यंदा डिसेंबरअखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. गोंदिया, भंडारा, वडसा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला, शेगाव असादेखील पुढील टप्पा मेट्रोचा राहील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. 

 

Web Title: Amravati-Patwara-Dharni road will be a national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.