अमरावती : विजेअभावी इर्विनचा फिजिओथेरपी विभाग बंद
By उज्वल भालेकर | Published: May 13, 2023 07:59 PM2023-05-13T19:59:49+5:302023-05-13T20:00:02+5:30
रुग्णांना नाहक त्रास, दोन दिवसांपासून रुग्णालयाच्या चकरा
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाचा त्रास हा रुग्णांना सहन करावा लागत आहे. रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागामध्ये मागील दोन दिवसांपासून वीज नसल्याने रुग्णांना रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. शनिवारी दुपारी एक वाजल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, तोपर्यंत अनेक रुग्णांना फिजिओथेरपी शिवायच परतावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हाडांचा आजार असो किंवा शस्त्रक्रियेनंतरचे उपचार म्हणून अनेक डॉक्टर औषधांबरोबरच फिजिओथेरपी उपचाराचा सल्ला देतात. जिल्हा सामान्य रुग्णालय येथील फिजिओथेरपी विभागातही रोज सरासरी १५ ते २० रुग्ण हे फिजिओथेरपीसाठी येतात. परंतु, मागील दोन दिवसांपासून रुग्णालयातील अस्थीरोग, बाह्यरुग्ण विभाग तसेच फिजिओथेरपी येथील वीज पुरवठा खंडित असल्याने विजेवर चालणारी फिजिओथेरपी मशिन बंद आहे. त्यामुळे रुग्णांना दोन दिवसांपासून चकरा माराव्या लागत आहेत. प्राप्त माहितीनुसार गुरुवारपासून या विभागातील वीज नाही. त्यामुळे या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला याची माहिती दिली. परंतु, दोन दिवसांपासून वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने शनिवारीदेखील अनेक रुग्णांना फिजिओथेरपीशिवायच परतावे लागले.
फिजिओथेरपी विभागातील वीज पुरवठा खंडित असल्याची माहिती गुरुवारीच संबंधित विभागाला दिली होती. शनिवारी दुपारपासून विद्युत पुरवठा सुरळीत झाला असून, फिजिओथेरपी सुरू झाली आहे.
डॉ. नरेंद्र सोळंके, आरएमओ, इर्विन