अमरावती : जरूड येथे क्रिकेट सट्ट्यावर धाडीत पिस्तूल, तीन जिवंत काडतूस जप्त, दोघांना अटक- मनसे पदाधिकारी पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 06:52 PM2017-12-23T18:52:33+5:302017-12-23T18:52:36+5:30
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जरूड येथे क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकण्यास गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथून देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतूस जप्त केले.
वरूड (अमरावती): पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जरूड येथे क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकण्यास गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथून देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतूस जप्त केले. मनसेचे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष संजय देशमुख याच्या घरी हा सट्टा सुरू होता. येथून दोघांना अटक करण्यात आली, तर संजय देशमुख पसार झाला आहे.
भारत व श्रीलंका यांच्यात २२ डिसेंबरला टी-२० क्रिकेट सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान जरूड येथील होळी चौकात मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय देशमुख याच्या घरी क्रिकेट सट्टा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर व सहायक पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज काकडे, पोलीस उपनिरीक्षक अशोकसिंह चव्हाण, हेडकॉन्स्टेबल वासुदेव नागलकर, जगदीश ठाकरे, नायक पोलीस कॉन्स्टेबल सुनील मलातपुरे, गजेंद्र ऊर्फ बाबा ठाकरे, कॉन्स्टेबल प्रवीण अंबाडकर, दिनेश कनोजिया, चालक नितेश तेलगोटे यांनी ४.३० वाजता धाडसत्र राबविले.
पहिल्या धाडीत साडेचार वाजता संजय देशमुख याच्या घरून अमोल पुंडलिकराव यावले (२२, रा. विठ्ठल चौक), विशाल अशोक भुजाडे (२२, रा. इंदिरानगर) यांना पोलिसांनी अटक केली. तीन मोबाइल, सोनी कंपनीचा एलईडी टीव्ही, रोख ६०८० रुपये जप्त करण्यात आले. झडतीदरम्यान संजय देशमुख याच्या घरी देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व तीन जिवंत काडतूस असा ८३ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी संजय देशमुख व नागपूर येथील अण्णा नामक युवक पसार होण्यात यशस्वी ठरले. चारही आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम ४ व ५ तसेच सहकलम ३, २५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून दोघांना वरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंगाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, पोलीस उपनिरीक्षक पंकज काकडे, अशोकसिंह चव्हाण, वासुदेव नागलकर, जगदीश ठाकरे, सुनील मलातपुरे, गजेंद्र ठाकरे, प्रवीण अंबाडकर, दिनशे कनोजिया,नितेश तेलगोटे, विनोद बाभूळकर करीत आहेत.
दुस-या धाडीत २० हजारांचा मुद्देमाल जप्त
जरुड येथेच सायंकाळी ५ वाजता गजानन सुखदेव ब्राह्मणे याच्या घरून एल.ई.डी. स्क्रीनसह मोबाइल, रोख रक्कम असा १९ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. येथून राजेंद्र सुखदेव ब्राम्हणे (३२, रा. इंदिरानगर) याला अटक करण्यात आली, तर गजानन व मोर्शी येथील एक अज्ञात आरोपी फरार आहे. तीन मोबाइल, सोनी कंपनीचा एलईडी, २ हजार ३०० रुपये रोख असा एकूण १९ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.