Amravati: आता बंदिजनांना ब्लँकेटऐवजी मिळणार डायमंड चादर, कारागृहांसाठी नियमावली लागू
By गणेश वासनिक | Published: November 6, 2023 06:29 PM2023-11-06T18:29:47+5:302023-11-06T18:30:36+5:30
Amravati News: ब्रिटिशकाळापासून कारागृहात बंदिजनांना पांघरुण म्हणून ब्लँकेट मिळत होते. मात्र, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता आता ब्लँकेटऐवजी बंदिजनांना डायमंड चादर ही पांघरुण म्हणून वापरास दिली जाणार आहे.
- गणेश वासनिक
अमरावती - ब्रिटिशकाळापासून कारागृहात बंदिजनांना पांघरुण म्हणून ब्लँकेट मिळत होते. मात्र, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता आता ब्लँकेटऐवजी बंदिजनांना डायमंड चादर ही पांघरुण म्हणून वापरास दिली जाणार आहे. कारागृह प्रशासनाच्या अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी ही नवीन नियमावली सर्व कारागृहांसाठी लागू केली आहे. पुणे येथील अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा यांच्या अध्यक्षतेखाली १० ऑक्टोबर २०२३ रोजी बैठक पार पडली.
महाराष्ट्र कारागृह नियमावली १९७९ मधील महाराष्ट्र कारागृह नियम १९६५ व सुधारित अधिसूचना १ डिसेंबर २०१५ अन्वये कारागृह अधीक्षकांना बंद्यांच्या बिछाना आणि बंदी गणवेश यामध्ये बदल किंवा वाढ करण्याची तरतूद आहे. कारागृहातील बंद्यांना ब्लँकेटऐवजी भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता डायमंड चादर ही पांघरुण म्हणून वापरण्यास देण्याच्या सूचना आहेत.
राज्यात ६० कारागृहांमध्ये नियमावली लागू
हल्ली थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून एकूण ६० कारागृहांतील सुमारे ४२ हजार बंदिजनांना ब्लँकेटऐवजी डायमंड चादर पांघरुण म्हणून वापरास मिळणार आहे. यात ९ मध्यवर्ती कारागृहे, २८ जिल्हा कारागृहे, एक विशेष कारागृह, नाशिक येथील किशोर सुधारालय, एक महिला कारागृह, १९ खुली कारागृहे आणि वसाहत अशा विविध ६० कारागृहांत बंदिस्त कैद्यांना डायमंड चादरींचे वाटप केले जाणार आहे.