Amravati: मराठा आरक्षणाच्या समर्थनात अमरावतीतही आंदोलन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा केला निषेध
By उज्वल भालेकर | Updated: October 31, 2023 19:07 IST2023-10-31T18:55:48+5:302023-10-31T19:07:28+5:30
Amravati News: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे अंतरवाली सराटी गावामध्ये उपोषण करत आहेत. त्याच्या समर्थनामध्ये राज्यभरात मराठा समाज बांधव हे आंदोलन करत आहेत.

Amravati: मराठा आरक्षणाच्या समर्थनात अमरावतीतही आंदोलन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा केला निषेध
- उज्वल भालेकर
अमरावती - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे अंतरवाली सराटी गावामध्ये उपोषण करत आहेत. त्याच्या समर्थनामध्ये राज्यभरात मराठा समाज बांधव हे आंदोलन करत आहेत. अशातच अमरावती शहरातही मंगळवारी राजकमल चौकात जरांगे-पाटील यांच्या समर्थनामध्ये तसेच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन कुंड्यामध्ये बेशरमचे झाड लावून त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटो ठेवत राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला ४० दिवसांच्या अवधीनंतर पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. मागील सहा दिवसांपासून त्यांनी अन्नपाणी नाकारल्याने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहेत. अशातच आता राज्यभरातील मराठा समाज जरांगे पाटलांच्या समर्थनामध्ये आंदोलन करत असून काही जिल्ह्यामध्ये हिंसक आंदोलनही झाल्याचे चित्र आहे. अशातच आता मराठा आरक्षण समर्थन समितीच्या वतीने राजकमल चौकात आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार मराठा समाजातील अनेक बांधव हे हालाखीच्या परिस्थितीमध्ये आपले जीवन जगत आहेत. आरक्षण नसल्यानेच मराठा समाज मागासलेला आहे. गरीब मराठा बांधवांमध्ये गुणवत्ता असून देखील आरक्षणाअभावी त्यांना निराशा पत्करावी लागते.
आज मराठा आरक्षणासाठी जे महाराष्ट्रात वलय सुरू आहे, ते अतिशय योग्य आहे. पण महाराष्ट्रातील सत्ता प्रस्थापित राजकीय मंडळी बेशरमच्या झाडाप्रमाणे खाली मान टाकून मराठ्यांच्या दुखण्यावर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मराठा बांधवांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या तसेच सरकारच्या वेळकाढू धोरणाचा यावेळी निषेध करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये नितीन देशमुख, रामेश्वर कापसे, प्रवीण वाकोडे, हर्षद ढोणे, प्रेम जवंजाळ, प्रफुल डोंगरे, भूषण डहाके, अजय गेडाम, संकेत नवले, रणजीत पाटीलसह इतर मराठा बांधव उपस्थित होते.