अमरावती-पुणे एक्स्प्रेस होणार ‘मेळघाट एक्स्प्रेस’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 05:02 PM2019-01-05T17:02:54+5:302019-01-05T17:05:02+5:30
अमरावती ते पुणे एक्स्प्रेस आता ‘मेळघाट एक्स्प्रेस’ या नावाने धावेल. याला केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
परतवाडा (अमरावती) : अमरावती ते पुणे एक्स्प्रेस आता ‘मेळघाट एक्स्प्रेस’ या नावाने धावेल. याला केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अमरावती शहर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्यालय आहे. अमरावतीसह मेळघाटातील लोक पुण्यापर्यंत, तर पुण्याची मंडळी मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह मेळघाटचे नैसर्गिक सौंदर्य, तेथील लोकजीवन, जैवविविधता बघण्याकरिता, अभ्यासाकरिता याच अमरावती-पुणे एक्स्प्रेसने ये-जा करतात. या एक्स्प्रेस गाडीला दुसरे कुठलेही नाव नाही.
ती केवळ अमरावती-पुणे एक्स्प्रेस या नावानेच धावते. मेळघाटचे महत्त्व अधोरेखित होण्याकरिता याच अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मेळघाट एक्स्प्रेस असे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार आनंदराव अडसूळ यांनी एका पत्राद्वारे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली होती.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचलकांनीही अडसूळ यांच्याकडे एक प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाचा उल्लेखही अडसूळ यांनी आपल्या या पत्रात केला आहे. खासदारांच्या या पत्राला रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मेळघाटचे नाव दिल्याबद्दल संबंधित विभागाच्या संचालकांना लेखी कळविले आहे. तसे पत्र खासदारांना प्राप्त झाले आहे.