Amravati: राजापेठ उड्डाणपुलावर अपघात; दुचाकीवरील तरुणाचा भरधाव ट्रकने घेतला बळी, दोन जखमी
By प्रदीप भाकरे | Published: May 27, 2024 08:15 PM2024-05-27T20:15:37+5:302024-05-27T20:16:00+5:30
Amravati Accident News: भरधाव ट्रकने मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक व अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला.
- प्रदीप भाकरे
अमरावती - भरधाव ट्रकने मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक व अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला. राजापेठ उड्डाणपुलाखाली कुथे हॉस्पिटलजवळ २७ मे रोजी सकाळी ११:४५ च्या सुमारास हा अपघात घडला. पीयुष तुकाराम राठोड (१८) असे मृताचे नाव आहे, तर ओम देवानंद कुरडे (१८) व आदित्य पांडुरंग धादोड (१८) अशी जखमींची नावे आहेत. ते तिघेही यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील नखेगाव येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी आदित्य धादोड यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी एमएच ४६-ई ३११० या ट्रकच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
नखेगाव येथील रहिवासी असलेला आदित्य अमरावती येथील एका गॅरेजवर काम करतो. त्या तिघांनीही नुकतीच बारावीची उत्तीर्ण केली आहे. २७ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास आदित्य गॅरेजवर गाडी धूत असताना त्याचा मित्र ओम कुरडे व पीयुष राठोड तेथे आले. त्यानंतर तिघांनी एमएच २७-एएक्स ८५९२ या दुचाकीने गाडगेनगर येथे जाऊन ॲडमिशन फॉर्म भरला. तेथून ओम व पीयुषला बसस्टँडला सोडण्याकरिता आदित्य राजापेठकडे निघाला. त्यावेळी आदित्य दुचाकी चालवत होता. त्याच्या मागे ओम व पीयुष बसलेले होते. अंदाजे ११:४५ च्या सुमारास तिघेही इर्विनकडून उड्डाणपुलावरून राजापेठ भागात खाली उतरत असताना अचानक एक मालवाहू वाहन राजापेठकडे वळले. त्यामुळे आदित्यने दुचाकीचे ब्रेक दाबले. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात पीयुष हा दुचाकीच्या उजव्या बाजूने खाली पडला, तर आदित्य व ओम डाव्या बाजूला खाली पडले. त्यामुळे पीयुषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच मरण पावला, तर ओमच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. बघ्यांची गर्दी वाढताच ट्रक चालकाने पळ काढला. दुसरीकडे राजापेठ व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.