Amravati: राज्यातील ३०५ बाजार समित्यांचे रँकिंग जाहीर, नाशिक, पुणे अव्वल, ३५ निकषांवर तपासणी
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 27, 2023 08:07 PM2023-10-27T20:07:22+5:302023-10-27T20:07:57+5:30
Amravati: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ कृषि उत्पन्न बाजार समित्यांची पणन विभागाने जाहीर केली. यासाठी ३५ निकषांवर तपासणी करण्यात आलेली होती व २०० गुणांच्या आधारे रँकिंग निश्चित करण्यात आले.
- गजानन मोहोड
अमरावती - बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ कृषि उत्पन्न बाजार समित्यांची पणन विभागाने जाहीर केली. यासाठी ३५ निकषांवर तपासणी करण्यात आलेली होती व २०० गुणांच्या आधारे रँकिंग निश्चित करण्यात आले. यामध्ये १६९ गुण मिळवित नाशिक व पुणे बाजार समिती संयुक्तपणे अव्वल ठरली आहे.
क्रमवारीच्या टॅापटेनमध्ये विदर्भातील पाच बाजार समित्यांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड दुसरी व वाशिम बाजार समिती चौथ्या क्रमांकावर राहिली आहे. याशिवाय धारशिव जिल्ह्यातील लोहारा शेवटच्या व पुणे जिल्ह्यातील मुळशी शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २०२२-२३ वर्षाकरिता ही क्रमवारी ठरली आहे. तालुका व जिल्हास्तरीय समितीने पडताळणी केलेले क्रमवारीचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांमार्फत पणन संचालनालयास यापूर्वी पाठविण्यात आलेले होते.
क्रमवारीसाठी असलेले निकष बाजार समित्यांसाठी आव्हानात्मक आहेत. यातून निकोप स्पर्धा झाल्याचे अमरावती जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या क्रमवारीमुळे शेतकऱ्यांना आपण विक्रीसाठी शेतमाल नेत असलेल्या बाजार समितीची क्रमवारी व तेथील सुविधा समजण्यास मदत होणार असल्याचे कुंभार म्हणाले.