Amravati: गोवंश तस्करीवर ग्रामीण पोलिसांची टाच; कारवाईचा चौकार १९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३६ गोवंशाची सुटका
By प्रदीप भाकरे | Published: June 15, 2023 08:55 PM2023-06-15T20:55:05+5:302023-06-15T20:55:22+5:30
Amravati:
- प्रदीप भाकरे
अमरावती : कत्तलीसाठी होणाऱ्या गोवंश तस्करीला लगाम लावण्यासाठी नेमलेल्या फिक्स पॉईंटवरील पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुरुवारी एकाच दिवशी परतवाडा, चांदूररेल्वे, पथ्रोट व अचलपूर पोलिसांनी कारवाईचा हा चौकार मारला. एकूण ३६ गोवंशांना जीवदान दिले.
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गोवंश तस्करीला लगाम लावण्यासाठी जिल्ह्यातील दहा ठिकाणी फिक्स पाॅईंट लावले आहेत. गुरूवारपासूनच ते कार्यान्वित करण्यात आले. त्याअनुषंगाने चार पोलीस ठाण्याने गुरुवारी गोवंशाची अवैध वाहतूक रोखली. परतवाडा पोलिसांनी हॉटेल द्वारका येथे नाकाबंदी करून करजगाव मार्गे परतवाडाकडे गोवंश घेऊन जाणाऱ्या चार मालवाहू वाहनांना थांबविले. त्यात १९ गोवंश आढळून आले. त्या वाहनांसह एकूण ११ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चांदूर रेल्वे पोलिसांनी सावंगी मग्रापूर येथे नाकाबंदी करून एका मालवाहू वाहनातून चार गोवंशांना जीवदान दिले. तेथून एकूण ५ लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहनचालक अ. साजिद शे. उमर (२७, रा. मनभा, जि. वाशिम) याच्याविरुद्ध चांदूर रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पथ्रोट पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान १३ गोवंशाना कत्तलीकरिता पायदळ घेऊन जाणाऱ्या चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १.५८ लाख रुपये किमतीचे गोवंश ताब्यात घेण्यात आले. पथ्रोट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तीनही कारवाईतील गोवंशांना देखभालीसाठी गोरक्षणात पाठविण्यात आले आहे.
अचलपुरात पकडले गोमांस
अचलपूर पोलिसांनी १५ जून रोजी सय्यद मुस्ताक सय्यद मुनाफ कुरेशी याच्या ताब्यातून १२० किलो गोमांस व कुऱ्हाड जप्त केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.