Amravati: कत्तल, तस्करी रोखली, ५४ गोवंशांची मुक्तता, अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई
By प्रदीप भाकरे | Published: November 24, 2023 07:14 PM2023-11-24T19:14:50+5:302023-11-24T19:15:03+5:30
Amravati News: शिरखेड पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई करत तब्बल ५४ गोवंशाचा जीव वाचवला. त्या गोवंशाला केकतपूर गोशाळेत हलविण्यात आले.
- प्रदीप भाकरे
अमरावती/ मोर्शी - शिरखेड पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई करत तब्बल ५४ गोवंशाचा जीव वाचवला. त्या गोवंशाला केकतपूर गोशाळेत हलविण्यात आले. २४ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास मोर्शी अमरावती मार्गावरील गोराळा येथे ही कारवाई करण्यात आली. तेथून अल्लाउददीन रज्जाक खान (३९, बडी होली सारंगपूर, मध्यप्रदेश), उस्मान खान मजित खान (३०, मुखेलवाडी, मध्यप्रदेश) व बादशाह खान खुदाबक्ष खान (३३, रा. पल्ला, हरियाणा) यांना अटक करण्यात आली.
शिरखेड पोलीस पथक शुक्रवारी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान गोराळाजवळ पेट्रोलिंग करीत असतांना त्यांनी मध्यप्रदेशातून येत असलेल्या ट्रकची पाहणी केली. ट्रकमध्ये लाकडी पाटयांच्या सहाय्याने दोन कप्पे तयार करुन त्यात ती जनावरे कोंबली होती. ती कत्तलीकरिता नेण्यात येत होती. ती सुमारे ८.५५ लाख रुपये किमतीचे जनावरे व १६ लाख रुपये किमतीचा ट्रक असा २४.५५ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. ट्रकमालकाचा शोध सुरू आहे.
यांनी केली कामगिरी
पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात शिरखेडचे ठाणेदार सुरज तेलगोटे, अंमलदार संजय वाघमारे, नितेश वाघ, गजानन तिजारे, शेख शकुर, चालक अरुण श्रीनाथ यांनी ही कारवाई केली.