समाजसेवेचा आदर्श : पोलीस आयुक्त वरपिता, तर खासदार बनणार वधुपिता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 08:36 PM2019-01-23T20:36:01+5:302019-01-23T20:36:24+5:30
अमरावती शहरातील कायदा व सुव्यस्थेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस आयुक्त वरपिता, तर खासदार वधुपित्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांच्या विसाव्या पाल्याच्या विवाहाच्या अनुषंगाने बुधवारी शंकरबाबांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांचा होकार घेतला.
अमरावती - शहरातील कायदा व सुव्यस्थेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस आयुक्त वरपिता, तर खासदार वधुपित्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांच्या विसाव्या पाल्याच्या विवाहाच्या अनुषंगाने बुधवारी शंकरबाबांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांचा होकार घेतला.
समाजसेवेचा आदर्श ठेवणारे शंकरबाबा पापळकर यांच्या वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य बालगृहातील वैशालीचा विवाह तेथीलच मूकबधिर मानसपुत्र अनिलशी ठरला आहे. या विवाहात वरपित्याची भूमिका बजाविण्याची विनंती शंकरबाबा यांनी बुधवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना केली. यावेळी पोलीस आयुक्तालयात संजयकुमार बाविस्कर व शंकरबाबा यांच्यात दिलखुलास चर्चा रंगली. शंकरबाबा यांनी आपल्या मानस मुलांची व्यथा सांगत, त्यांच्या आगामी भविष्याची चिंता व्यक्त केली. आयुक्तांनी नि:संकोचपणे हा प्रस्ताव स्वीकारला. बाविस्कर यांची संवादशैली व त्यांच्या कार्यप्रणालीने शंकरबाबा प्रभावित झाले होते.
खा. आनंदराव अडसूळ वैशालीचे कन्यादान करणार आहे. येत्या २ फेब्रुवारी रोजी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, खा. आनंदराव अडसुळ व पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांची लग्न समारंभाविषयी विशेष बैठक होईल. त्या दिवशी लग्नाचा मुहूर्त ठरेल.
गाडगेबाबांची गोदडी आयुक्तांच्या खांद्यावर
१९५५ साली बहिरमच्या यात्रेत शंकरबाबा गेले असता, त्यांची भेट गाडगेबाबांशी झाली होती. त्यावेळी गाडगेबाबांनी शंकरबाबांना त्यांची गोदडी भेट दिली होती. समाजहित जोपासण्यासाठी जो सत्यतेची बाजू घेऊन काम करीत असेल, समाजउपयोगी कार्य करीत असेल, अशा व्यक्तीच्या खाद्यावर ती गोदडी टाकशील, असे गाडगेबाबांनी शंकरबाबांना सांगितले होते. गाडगेबाबांचे ते व्यक्तव्य शंकरबाबांच्या स्मरणात होते. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याशी संवाद साधताना शंकरबाबांना गाडगेबाबांचे ते शब्द आठवले. त्यामुळे शंकरबाबांनी गाडगेबाबांची ती गोदडी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या खाद्यांवर ठेवून त्यांना तो सन्मान दिला.
असे मिळाले वैशाली व अनिल
मुकबधीर अनिल हा दोन वर्षांचा असताना मुंबई स्थित डोंगरी येथील भेंडीबाजारमध्ये बेवारस स्थितीत आढळून आला होता. त्याला बाल कल्याण समितीच्या आदेशाने वझ्झर येथील बालगृहात पाठविण्यात आले होते. सातव्या वर्गापर्यंत शिकल्यानंतर अनिलला परतवाडा येथील मूकबधिरांच्या शाळेत नोकरी देण्यात आली. त्याचे लग्न वैशाली नामक अनाथ मुलीशी जुळविले आहे. वैशाली ही १९९५ साली चेंबूर येथे एका कचºयाच्या ढिगाºयावर बेवारस अवस्थेत आढळून आली होती. दोन वर्षांपर्यंत मुंबई पोलिसांनी तिच्या माता-पित्याचा शोध घेतला. त्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशाने तिलाही वझ्झर येथील बालगृहात आणल्या गेले होते. आता ती २३ वर्षांची झाली आहे.
शंकरबाबा यांच्या मानसपुत्राच्या वरपित्याची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांच्या विवाह सोहळ्यात जाऊन ती जबाबदारी पूर्ण करू.
संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त.