तंत्रज्ञानाच्या साह्याने अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी फुलवली स्ट्रॉबेरी शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 02:20 PM2019-03-18T14:20:58+5:302019-03-18T14:21:20+5:30
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी दाभा गावातील एका खासगी शेतात स्ट्रॉबेरीची शेती फुलविली आहे. आयआयटी दिल्लीची चमू या प्रकल्पाची पाहणी करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी दाभा गावातील एका खासगी शेतात स्ट्रॉबेरीची शेती फुलविली आहे.. आयआयटी दिल्लीची चमू या प्रकल्पाची पाहणी करणार आहे.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दाभा येथील एका शेतात जागा घेऊन स्ट्रॉबेरी शेतीचा प्रकल्प उभारला. त्यामध्ये स्ट्रॉबेरी शेतीच्या माध्यमातून उन्नत भारत अभियानांतर्गत हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयाने बदल घडवून आणला आहे. शेतीशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ही शेती फुलविली. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. श्रीकांत चेंडके यांच्या पुढाकाराने बडनेरानजीक दाभा येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रॉबेरी प्रकल्प डिसेंबर-२०१८ मध्ये सुरू करण्यात आला होता. प्रकल्प प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख उज्ज्वला क्षीरसागर व आशिष खराते यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या तीन महिन्यांत प्रकल्प साकारला. स्ट्रॉबेरी पीक ठरावीक क्षेत्र आणि वातावरणामध्येच घेतले जाते; इतर कुठल्याही भागात हे नगदी पीक घेता येत नसल्याचे खोडून काढत, पिकांना आवश्यक तेवढे तापमान व मातीची क्षमता वाढवून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कुठलेही पीक घेता येते, हे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले. प्रकल्पाला शेतमालक नारायणराव वैद्य, वीजपुरवठा करणारे नामदेवराव टेंभुर्णे, पाणी उपलब्ध करणारे पंकज लढ्ढा, खतांचा पुरवठा करणारे रवि वाठ यांचे मोठे सहकार्य लाभले. प्रकल्पाकरिता शुभम किन्हीकर, ऋषिकेश सपकाळ, विशाल कुकडे, उदीत मिश्रा, प्रियंता चोरडे, प्रगती उमेकर, दीक्षिता बोरेकर, दीक्षा राऊत, रमेश गजबार, प्रतीक गावंडे, शाम नाले, शहीद शेख, मो. साद हुसैन या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
६२ किलोचे घेतले पीक
विद्यार्थ्यांनी निवड केलेल्या शेतामध्ये ग्रीन हाऊस व स्ट्रॉबेरी पिकासाठी आवश्यक वातावरण निर्मिती करीत जानेवारी ते मार्च अवघ्या अडीच महिन्यांत तब्बल ६२ किलो पीक घेतले. अशा प्रकारचा प्रकल्प संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठस्तरावर प्रथम ठरला असून, या यशस्वी प्रकल्पाची दखल शासन, प्रशासन व देशातील ख्यातनाम शास्त्रज्ञांनीसुद्धा घेतली आहे.
स्ट्रॉबेरी प्रकल्पाने शिक्षणाची व्याख्या बदलली
हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयाने साकारलेली स्ट्रॉबेरी शेती प्रकल्प सर्वांगीण विकासाचा प्रकल्प ठरला आहे. या प्रेरणेतून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मोठ्या स्तरावर असा प्रकल्प साकार करून विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणावर भर देईल, असा विश्वास कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केला. व्यासपीठावर श्रीकांत चेंडके, प्राचार्य मराठे, रजिस्ट्रार एस.व्ही. ढोले, उज्ज्वला क्षीरसागर, उन्नत भारत अभियानाच्या प्रादेशिक समन्वयक अर्चना बारब्दे यांच्यासह सर्व विभागप्रमुख व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.