अमरावतीत टी. राजा डिटेन, आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याच्या अटीवर सोडले

By गणेश वासनिक | Published: August 27, 2024 08:39 PM2024-08-27T20:39:47+5:302024-08-27T20:39:56+5:30

तेलंगणाचे आमदार : तिवसा पोलिसांनी रोखला ताफा, भाजप पदाधिकाऱ्यांसोबत तू-तू-मै-मै

Amravati T. raja Deten, released on condition of not making incriminating statements | अमरावतीत टी. राजा डिटेन, आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याच्या अटीवर सोडले

अमरावतीत टी. राजा डिटेन, आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याच्या अटीवर सोडले

अमरावती : परतवाडा येथील दहीहंडी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी येत असलेले तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंह यांना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तिवसा पोलिसांनी रोखले. सुमारे तासभर त्यांना पोलीस ठाण्यामध्ये डिटेल करण्यात आले होते. कुठलेही आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याच्या अटीवर त्यांना सोडण्यात आले. 

हैद्राबादच्या गोशामहल मतदारसंघाचे आमदार असलेले टी. राजा सिंह यांची अनेक वक्तव्ये वादग्रस्त ठरली आहेत. परतवाडा येथील कार्यक्रमात ते येणार असल्याचे अमरावती ग्रामीण पोलिसांना समजताच मंगळवारी दुपारी तिवसा येथील पेट्रोल पंपाजवळ त्यांचा ताफा रोखण्यात आला. यामुळे त्यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांसोबत पोलिसांची तू-तू-मै-मै झाली. त्यांचा ताफ्यामुळे छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनादेखील त्याबाबत माहिती देण्यात आली. 

सुमारे एक तास मोठा ड्रामा रंगल्यानंतर परतवाडा येथील दहीहंडी सोहळ्यादरम्यान कुठलेही आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाही तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे भाषणदेखील करणार नाही, असे टी. राजा यांनी पोलिसांना बंधपत्रावर लिहून दिले. त्यानंतरच आ. टी. राजा हे सायंकाळी ७ च्या सुमारास परतवाडाकडे रवाना झाले. 

दरम्यान, परतवाडा येथे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशान्वये तेथे अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्र्याचा फोन; ठाकुरांचा इशारा 
आमदार टी. राजा सिंह यांना तिवसा येथे स्थानबद्ध करण्यात येणार होते. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती पोलिस अधीक्षकांना फोन करून त्यांना मार्ग मोकळा करून दिला. परंतु, जिल्ह्यातील वातावरणात दूषित झाल्यास किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी ही पोलिसांची राहील, असा इशारा काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे

आमदार टी. राजा सिंह यांना तिवसा येथे डिटेन केले होते. प्रतिबंधात्मक कारवाई करून परतवाडा येथील कार्यक्रमासाठी सोडण्यात आले. 
- किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा

आयोजकांनी दडविली माहिती
परतवाडा येथे मंगळवारी सायंकाळी होणाऱ्या दहीहंडीला परतवाडा पोलिसांनी परवानगी दिली. मात्र, दहीहंडी दरम्यान आमदार टी. राजा सिंह येणार आहेत, हे आयोजकांनी पोलिसांकडून दडवून ठेवल्याची माहिती यावेळी पुढे आली.

Web Title: Amravati T. raja Deten, released on condition of not making incriminating statements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.