अमरावती शिक्षक मतदारसंघ; महाआघाडी आणि भाजपच्या पराभवाला अतिआत्मविश्वास कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 07:00 AM2020-12-05T07:00:00+5:302020-12-05T07:00:21+5:30
Amravati Teachers Constituency ‘अंडरकरन्ट’ असल्याचा भाजपक्षाचा अतिआत्मविश्वास आणि सत्तेच्या सूर्याचे तेज कुठल्याही चेहऱ्याला प्रकाशमान करू शकते, हा महाआघाडीचा स्वत:वरील आंधळा विश्वास दोन्ही बाजूंच्या राजकीय पक्षांना पराभवाच्या मार्गाने नेणारा ठरला.
गणेश देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
‘अंडरकरन्ट’ असल्याचा भाजपक्षाचा अतिआत्मविश्वास आणि सत्तेच्या सूर्याचे तेज कुठल्याही चेहऱ्याला प्रकाशमान करू शकते, हा महाआघाडीचा स्वत:वरील आंधळा विश्वास दोन्ही बाजूंच्या राजकीय पक्षांना पराभवाच्या मार्गाने नेणारा ठरला.
अपक्ष उमेदवार किरण सरनाईक निवडून आलेत. ‘मेहनत इतनी खामोशी से करो, की सफलता शोर मचा दे’ हा शेर निवडणूक जिंकण्यासाठी सरनाईकांनी अमलात आणलेल्या कार्यशैलीचे चपखल वर्णन ठरावा. राजकीय वारसा आणि वातावरण लाभलेल्या वाशिम जिल्ह्यातील सरनाईक यांनी निवडणुकीची तयारी शांततेने, परंतु नियोजनबद्धरीत्या केली. मला निवडून देणे तुमच्या कसे हिताचे, हे शिक्षकांना पटवून देण्यात ते यशस्वी ठरले. राज्यातील सत्तापक्षाला आणि विरोधी पक्षाला नेमके तेच जमले नाही.
अमरावतीचे विभागीय आयुक्त आणि पाच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चाललेल्या ४० तास अखंडित मतमोजणीदरम्यानचे अनेक क्षण उत्कंठावर्धक ठरले. लढत एकतर्फी कुठल्याही फेरीत नव्हतीच. ती कायम तिरंगी होती. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक, महाआघाडीचे श्रीकांत देशपांडे आणि अपक्ष शेखर भोयर हा क्रम सातत्याने कायम राहिला. सरनाईक यांची सुरुवातीला सुमारे एक हजार मतांची आघाडी अखेरपर्यंत धीम्या गतीने दुपटीपार गेली.
अनुदान, पेन्शनचा मुद्दा निर्णायक
या निवडणुकीत शिक्षकांचे दोन महत्त्वाचे मुुद्दे चर्चेत आलेत. ज्या शाळांना अनुदान नाही, त्या शाळांतील शिक्षकांना वेतन मिळत नाही. दशक, दोन दशकांहून अधिक काळापासून असे शिक्षक शाळेला अनुदान मिळेल नि आम्हाला वेतन, या आशेवर जगत आहेत. मुलाबाळांसाठी पैसाच नसल्यामुळे काहींनी आत्महत्याही केल्यात. सुमारे चार हजार शिक्षक या विनावेतनाच्या यातना भोगताहेत. श्रीकांत देशपांडे यांची यापूर्वीच्याही सत्तेशी जवळीक असताना त्यांनी हा मुद्दा सोडविला नसल्याच्या कारणाहून शिक्षकांमध्ये नाराजी होती. मतांचा जोगवा मागण्यासाठी देशपांडे यांच्याकडून जाणाऱ्या ‘फोन कॉल्स’ला अनेक शिक्षकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या. त्याची सोशल मीडियावर चर्चाही झाली.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा सन २००५ नंतरच्या शिक्षकांना पेन्शन बाद केल्याचा. या मुद्याबाबतही शिक्षकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. आमदार एकदाच निवडून गेले तरी त्यांना पेन्शन आणि आम्ही शिक्षकी पेशात अख्खी हयात देऊनही म्हातारपणी पेन्शन नाही, हा कसला न्याय? अशा भावना शिक्षकांमध्ये व्यक्त होत राहिल्या. शिक्षकांच्या या भावनांचा आदर करून संवेदनशीलतेने पुढे जाण्याऐवजी महाआघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयंत पाटील, उदय सामंत, वर्षा गायकवाड, बच्चू कडू, रोहित पवार यांच्यासारख्या डझनभर नेत्यांच्या सभांचा सपाटाच लावला. श्रीकांत देशपांडे मानसपुत्र असल्याची शरद पवारांची क्लिपही आणली गेली. देशपांडे यांनी काम केल्याचे आम्ही साक्षीदार आहोत, असे सर्वांनीच शिक्षकांना ठासून सांगितले. शिक्षकांच्या मात्र ते गळी उतरले नाही. सत्तेच्या भरवशावर उमेदवार निवडून आणण्याचा अट्टाहास करण्याऐवजी शिक्षकांना चालणारा चेहरा देण्याची नीती महाआघाडीने आखली असती, तर अमरावती शिक्षक मतदारसंघावरही महाआघाडीचाच विजयी झेंडा असता.
भाजप मुख्य लढतीतून बाद
‘आमच्या पक्षाचा अंडरकरंट आहे. लोकांना मोदी आणि देवेंद्र फडणवीस हवे आहेत,’ हा भाजपक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला अतिआत्मविश्वास शिक्षक मतदारांना यावेळी नकोसा झाला. पक्षाला आणि उमेदवारांना अखेरपर्यंत त्याचा अंदाज आलाच नाही. ‘भाजपक्षाचे तिकीट म्हणजे आमदारकीवर शिक्कामोर्तब,’ हे समीकरण आता जुने झाल्याचे या निकालाने अधोरेखित केले. अमरावती हे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या भाजपच्या दोन्ही महत्त्वपूर्ण नेत्यांचे मामांचे गाव. दोघांनाही अमरावतीची त्यामुळे आपुलकी. अमरावतीकरांनाही दोन्ही नेत्यांचे अप्रूप. असे असले तरी यावेळी शिक्षकांवर त्यांची जादू चालली नाही. भाजपक्षाचे उमेदवार नितीन धांडे मुख्य लढतीतच आले नाहीत. २२ व्या फेरीत ते बादही झाले. अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांनी अखेरपर्यंत तृतीय स्थान टिकवून ठेवले.
या निवडणुकीत शिक्षकांनी ८९ टक्के असे ‘रेकॉर्डब्रेक’ मतदान केले. सत्तापक्ष असो वा विरोधी, कुणाच्याही प्रभावात न येता शिक्षकांनी त्यांचा प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडला - अनुदान आणि पेन्शनसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर तो निडरपणे सभागृहात भांडू शकावा म्हणून!