वाघ, बिबट्याच्या वर्गवारीत आता भेकर अन् तडस, वन्यप्राण्यांच्या अनुसूचीत नव्याने समावेश, शिकारीस प्रतिबंध
By गणेश वासनिक | Published: March 10, 2024 07:39 PM2024-03-10T19:39:34+5:302024-03-10T19:39:57+5:30
Amravati News: भारतीय वन्यजीव १९७२ च्या कायद्यांतर्गत वन्यप्राण्यांच्या अनुसूचीत दर्शविलेल्या वाघ, बिबट्याच्या वर्गवारीत आता भेकर अन् तडस या दोन वन्यप्राण्यांचाही समावेश झाला आहे. २०२२ मध्ये हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता भेकर व तडस यांचे संवर्धन, सुरक्षिततेची जबाबदारी वन विभागावर आली आहे.
- अमोल कोहळे
पोहरा बंदी (अमरावती) - भारतीय वन्यजीव १९७२ च्या कायद्यांतर्गत वन्यप्राण्यांच्या अनुसूचीत दर्शविलेल्या वाघ, बिबट्याच्या वर्गवारीत आता भेकर अन् तडस या दोन वन्यप्राण्यांचाही समावेश झाला आहे. २०२२ मध्ये हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता भेकर व तडस यांचे संवर्धन, सुरक्षिततेची जबाबदारी वन विभागावर आली आहे.
भारतीय संसदेने १९७२ मध्ये वन्यजीव (संरक्षण) कायदा लागू केला, जो देशातील वन्यजीव (वनस्पती आणि प्राणी) यांचे संरक्षण आणि संरक्षण प्रदान करतो. तो पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र विभागांचा अविभाज्य भाग आहे. त्यानुसार वनसंवर्धनाचा अविभाज्य घटक आणि ज्याची शिकार करणे गुन्हा आहे, अशा वाघ-बिबट्या आदी वन्यप्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी शासन-प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जातात. त्याकरिता जंगलाला राखीव आणि अभयारण्याचा स्वतंत्र दर्जा बहाल केला जातो.
आता १९७२ च्या कायद्यामधील वन्यप्राण्यांच्या अनुसूचीत काही दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. वाघ, बिबट्याच्या रांगेतील 'अ' वर्गवारीत भेकर अन् तडस यांचाही समावेश करण्यात आला आहेत. हे वन्यप्राणी अमरावतीनजीकच्या वडाळी-चांदूर रेल्वे या वनपरिक्षेत्रातील विस्तीर्ण जंगलात मोठ्या संख्येने आढळून आले आहे. त्यामुळे येत्या काळात हा परिसर राखीव जंगल होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. वडाळी-चांदूर रेल्वेच्या जंगलात वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी जागोजागी पाणवठे तयार करण्यात आले असून, पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. पाणवठ्यांवर ये-जा करणाऱ्या वन्यप्राण्यांवरही ट्रॅप कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. काही ठिकाणी मचाण तयार करण्यात आले आहेत.
हे वन्यप्राणी ‘अ’ वर्गवारीत
वन्यप्राण्यांच्या अनुसूचीमध्ये ‘अ’ वर्गवारीत भेकर, तडस, चौसिंगा, खवल्या मांजर, काळवीट, रानकुत्रा, कोल्हा, जंगली मांजर, सायाळ, सांबर, वानर, लांडगा, खार, घोरपड, मोर, अजगर, कासव, चिकारा यांचा समावेश आहे.
हे वन्यप्राणी ‘ब’ वर्गवारीत
नीलगाय, चितळ, रानडुक्कर, ससा