डेंग्यूरुग्णांमध्ये अमरावती अव्वल! पश्चिम व-हाडातील स्थिती भयावह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 05:31 PM2018-08-17T17:31:06+5:302018-08-17T17:31:25+5:30
डेंग्यू या जीवघेण्या आजाराचा पश्चिम व-हाडात चोरपावलांनी प्रसार होत आहे. डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत अमरावती जिल्हा अव्वल असून, खासगी डॉक्टरांकडे एनएस-वन व इतर रक्तनमुन्यांच्या चाचणी पॉझिटिव्ह असलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत.
अमरावती : डेंग्यू या जीवघेण्या आजाराचा पश्चिम व-हाडात चोरपावलांनी प्रसार होत आहे. डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत अमरावती जिल्हा अव्वल असून, खासगी डॉक्टरांकडे एनएस-वन व इतर रक्तनमुन्यांच्या चाचणी पॉझिटिव्ह असलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. यवतमाळच्या सेंटिनल सेंटरमधून ३९ पेक्षा जास्त नमुन्यांचा डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
डेंग्यू संशयित दोन जणांचा गुरुवारी बळी गेला. इतर जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र, डेंग्यूवर उपाययोजना करण्यास शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे.
अमरावतीमधील खासगी डॉक्टरांकडे एक हजारापेक्षा जास्त रुग्ण डेंग्यूचा उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांची पहिल्या सात दिवसांत करावयाची एनएस-वन ही रक्त नमुन्यातील चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली आहे. मागील आठवड्यापर्यंत अमरावती महापालिकेने साडेपाचशेपेक्षा जास्त रक्तनमुने यवतमाळच्या सेंटिनल सेंटरमध्ये पाठविले होते. ५० पेक्षा जास्त नमुने हे ग्रामीण भागातूनसुद्धा गेले. तेव्हा ३९ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल यवतमाळच्या शासकीय सेंटिनल सेंटरने दिला. परंतु, या ठिकाणी एनएस-वनची किट उपलब्ध नसल्याने अनेक डेंग्यूरुग्ण पॉझिटिव्ह असल्यानंतरही अनेकांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. त्याकारणाने खासगी डॉक्टरांनी केलेल्या चाचण्या व शासकीय अहवालातील चाचणीमध्ये आलेले आकडेवारीमध्ये प्रचंड तफावत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातही अनेक रुग्ण डेंग्यूचे पॉझिटिव्ह आहेत. येथून १०० रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. या महिन्यामध्ये १२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आल्याची माहिती सेंटिनल सेंटरने दिली आहे. अकोला जिल्ह्यात येथील शासकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार डेंग्यूच्या इलायझा कन्फर्म चाचणीत दोन रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. वाशिम जिल्हयातीही एकही डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती तेथील आरोग्य विभागाने दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यातही १० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावतीत सर्वाधिक रुग्ण असल्याने शासकीय यंत्रणेची झोप उडाली आहे. डेंग्यूच्या तापाने अनेक जण फणफणत आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड दाखविले जात आहेत.
अमरावतीत सर्वाधिक रुग्ण
शहरातील खासगी डॉक्टरांकडे आतापर्यंत डेंग्यूचे हजारएक रुग्ण आढळून आले. काही डॉक्टरांकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाला अद्यापही माहिती मिळालेली नाही. यासंदर्भात आरोग्य सेवा सहायक संचालक (हिवताप) अभिनव भुते यांनी दोनदा या ठिकाणी बैठकासुद्धा घेतल्या. तरीही डेंग्यूची साथ नियंत्रणात आली नाही. रोज डेंग्यूचे रुग्ण वाढतच असून, सेंटिनल सेंटरने ३९ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिला. परंतु, एनएस-वन चाचणीत शेकडो रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. तथापि, शासकीय यंत्रणा अशा रुग्णांना संशयित मानते आणि यवतमाळच्या अहवालानंतर डेंग्यू असल्याचे निदान करते.