Amravati: ६० बालकांचा ‘टू-डी इको’, २५ जणांना आढळला हृदयविकार, जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी
By उज्वल भालेकर | Published: July 16, 2024 06:57 PM2024-07-16T18:57:44+5:302024-07-16T18:58:33+5:30
Amravati News: अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे मंगळवारी हृदयाचा त्रास होत असलेल्या ६० बालकांचे टू-डी इको करण्यात आले. यामध्ये २५ बालकांमध्ये हृदयाला छिद्र म्हणजेच हृदयविकाराचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले असून, लवकरच या बालकांचे प्राण वाचविण्यासाठी आरबीएसकेअंतर्गत मोफत हृदयविकार शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
- उज्वल भालेकर
अमरावती - जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे मंगळवारी हृदयाचा त्रास होत असलेल्या ६० बालकांचे टू-डी इको करण्यात आले. यामध्ये २५ बालकांमध्ये हृदयाला छिद्र म्हणजेच हृदयविकाराचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले असून, लवकरच या बालकांचे प्राण वाचविण्यासाठी आरबीएसकेअंतर्गत मोफत हृदयविकार शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या वर्षात दुसऱ्यांदा रुग्णालयात टू-डी इको तपासणी शिबिर राबविण्यात आले.
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे याचे वेळीच योग्य निदान झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य आहे. लहान मुलांनाही जन्मत:च हृदयविकार होतात. यामध्ये त्यांच्या हृदयाला छिद्र असणे, श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे यांसारखी लक्षणे असतात. त्यामुळे अशा बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे वेळीच निदान करून मोफत उपचार केले जातात. हृदयविकार आजाराचे निदान करण्यासाठी ‘टू-डी इको’ हे आवश्यक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या टू-डी इको मशीनवर मंगळवारी हृदयाचा त्रास जाणवत असलेल्या ६० बालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ३० बालकांमध्ये हृदयविकार असल्याचे निदान करण्यात आले आहे. त्यामुळे या बालकांवर लवकरच मोफत हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या वेळी रुग्णांची तपासणी आचार्य विनोबा भावे रुग्णालय येथील बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. शंतनू गोमासे यांनी केली. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी डॉ. शंतनू गोमासे यांचे रुग्णालयाच्या वतीने स्वागत केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडवू उपस्थित होते. तपासणी मोहीम यशस्वी करण्यासाठी आरबीएसके जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक नीलेश पुनसे तसेच संपूर्ण अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले