Amravati: दुचाकी शोरूमधारकाची १३ लाखांनी फसवणूक
By प्रदीप भाकरे | Published: May 7, 2023 02:42 PM2023-05-07T14:42:52+5:302023-05-07T14:43:25+5:30
Amravati News: फेस्टिवल काउंटरच्या नावावर शोरूममधून घेतलेल्या १४ दुचाकी परस्पर विकण्यात आल्या. हा धक्कादायक प्रकार येथील नवाथे चौकस्थित श्रेयस मोटर्समध्ये घडला.
अमरावती - फेस्टिवल काउंटरच्या नावावर शोरूममधून घेतलेल्या १४ दुचाकी परस्पर विकण्यात आल्या. हा धक्कादायक प्रकार येथील नवाथे चौकस्थित श्रेयस मोटर्समध्ये घडला. याप्रकरणी श्रेयस मोटर्सचे सुरेश भांडारकर यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी स्नेहलकुमार गोपालराव वानखडे (३४, अशोक कॉलनी, अमरावती) व वैभव रवींद्र बगणे (२७, कठोरा रोड, अमरावती) यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यात भांडारकर यांची सुमारे १२ लाख ८३ हजार ९६० रुपयांनी फसवणूक करण्यात आली.
दोन्ही आरोपींनी भांडारकर यांचा विश्वास संपादन केला. १३ ऑगस्ट २०२२ रोजी आरोपींनी धामणगाव रेल्वे येथे स्वरांश हिरो मोटर्स या नावाने फेस्टिवल काउंटर उघडले. त्यावेळी त्यांनी भांडारकर यांच्याकडून हिरो कंपनीच्या १४ दुचाकी विक्रीकरीता ताब्यात घेतल्या. त्या १४ दुचाकीच्या विक्रीबाबत भांडारकर यांना कुठलिही माहिती वा पुर्वकल्पना न देता आरोपींनी त्या दुचाकी परस्पर ग्राहकांना विकल्या. १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत त्यांनी तो व्यवहार केला. विक्रीतून आलेली रक्कम देखील भांडारकर यांना दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ६ मे रोजी रात्री राजापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.