अमरावती विद्यापीठाच्या बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा १० एप्रिलपासून
By गणेश वासनिक | Published: April 4, 2023 03:58 PM2023-04-04T15:58:17+5:302023-04-04T15:58:38+5:30
९९ हजार ७८७ परीक्षार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त, पाचही जिल्ह्यात १८३ केंद्रावर परीक्षांचे नियाेजन
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२३-२०२४ बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा १० एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. या परीक्षांमध्ये ९९ हजार ७८७ बॅकलॉग विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून,अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ जिल्ह्यातील १८३ केंद्रावर परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.
उन्हाळी परीक्षांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाने दुसऱ्यांदा २६ ते ३१ मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संधी दिली अहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाकडे नियमित विद्यार्थी १ लाख १८ हजार ८७४, तर बॅकलॉगच्या ९९ हजार ७८७ परीक्षार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. ३१ मार्च २०२३ ही ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लींक बंद करण्यात आली आहे. बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० एप्रिल ते ३ मे २०२३ या दरम्यान घेण्यात येणार आहे. ३० एप्रिल ते १० मे २०२३ या दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. तर नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ११ ते ३१ मे २०२३ या कालावधीत होणार आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, फार्मसी अशा शाखांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. उन्हाळी परीक्षांमध्ये आतापर्यंत सुमारे २ लाख १८ हजार ६६१ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज मिळाले आहे.
१० एप्रिलपासून बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येतील. त्याकरिता परीक्षा ऑफिसर्स, को-ऑफिसर्सच्या नियुक्त्या केल्या जातील. १८३ केंद्रावरील महाविद्यालयांमध्ये परीक्षांचे नियोजन केले जाणार आहे. परीक्षा संचालनासाठी आवश्यक ती तयारी केली जात आहे.
- मोनाली वानखडे-तोटे, प्रभारी संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ