अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा एप्रिलपर्यंत स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 07:45 PM2020-04-01T19:45:37+5:302020-04-01T19:46:09+5:30
उन्हाळी परीक्षांचे कॅलेंडर बदलणार : ‘लॉकडाऊन’, संचारबंदीचा परिणाम
अमरावती : कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षा एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी १ एप्रिल रोजी परीक्षा स्थगित करण्याबाबत परिपत्रक निर्गमित केले आहे.
अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षा १५ एप्रिलपासून सुरू होणार होत्या. त्यानुसार प्रशासनाने परीक्षांचे वेळापत्रक तयार केले. मात्र, १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे आपसुकच परीक्षांचे कॅलेंडर बदलणार आहे. परिणामी एप्रिलपर्यंत लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३९४ महाविद्यालयांसाठी परीक्षा स्थगितीबाबतचे आदेश लागू करण्यात आले आहे. तसेच ‘लॉकडाऊन’मुळे अमरावती विद्यापीठ अंतर्गत सर्वच महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय अगोदरच कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे. १४ एप्रिलनंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परिस्थितीनुरूप परीक्षासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. अमरावती विद्यापीठाच्या बी.एस्सी., अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा १५ एप्रिलपासून प्रारंभ होणार होत्या. मात्र, नव्या आदेशामुळे परीक्षांचे कॅलेंडर बदलणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
उन्हाळी सत्राच्या ६२५ परीक्षा
अमरावती विद्यापीठाला उन्हाळी २०२० परीक्षेत ६२५ परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. एप्रिलपर्यंत परीक्षा स्थगित केल्या असल्या तरी मे महिन्यात परीक्षा घ्यावा लागणार आहे. यात मानव्यविद्या शाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, आंतरविद्या शाखीय अभ्यास विद्याशाखा या चार शाखांचा समावेश आहे. तर, ३.२५ लाख विद्यार्थी सेमिस्टर पॅटर्न परीक्षेला सामोरे जाणार आहे.
१५ एप्रिलपासून उन्हाळी परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. परीक्षांचे वेळापत्रकसुद्धा जाहीर करण्यात आले आहे. मात्र, कोरोना विषाणुमुळे ‘लॉकडाऊन’ असल्याने परीक्षा एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास करावा. यू-ट्युब, आॅनलाईन अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, अमरावती विद्यापीठ