अमरावती विद्यापीठात नवसंशोधकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 10:06 PM2018-12-25T22:06:27+5:302018-12-25T22:06:52+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा २६ व २७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे विद्यापीठात नवसंशोधकांची मांदियाळी असणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा २६ व २७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे विद्यापीठात नवसंशोधकांची मांदियाळी असणार आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, प्रतिभेला वाव मिळावा म्हणून २००६ मध्ये तत्कालीन राज्यपाल एस.एम. कृष्णा यांच्या कल्पनेतून आविष्कार संशोधन महोत्सवाला सुरुवात झाली. या स्पर्धेत मानव्यविद्या, भाषा, कला व ललितकला, वाणिज्य व्यवस्थापन आणि कायदा, विज्ञान, कृषी व प्राणी, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आदी विभागांमध्ये विद्यार्थी संशोधनात्मक प्रकल्प सादर करतील. महाराष्ट्रात प्रत्येक विद्यापीठात या स्पर्धेचे आयोजन केल्या जाते.
यापूर्वी १७ व १८ डिसेंबर रोजी ही स्पर्धा अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर घेण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातून वर्गवारी व स्तरामधून निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादरीकरण होईल.
२६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी भवन येथे आविष्कार स्पर्धेचे उद्घाटन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. प्रमुख अतिथी म्हणून दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य जी. गोपाल रेड्डी यांच्या हस्ते होणार असून, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
२७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता विद्यापीठ दृक्श्राव्य सभागृहात समारोपीय कार्यक्रम होईल. त्याचे अध्यक्षस्थान कुलगुरू मुरलीधर चांदेकर भूषवतील. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मानव संसाधन व विकास मंत्रालयाच्या उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष पद्मभूषण विजय भटकर राहणार असून, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपले संशोधन सादर करावे, असे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, आय.आय.एल.चे संचालक डी.टी. इंगोले व आविष्कार समन्वयक आनंद अस्वार यांनी केले आहे.